आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यवधींना चुना:सिंदखेडराजा तालुक्यात सिंचन साहित्य वाटपामध्ये भ्रष्टाचार?

सिंदखेडराजा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची गंगा असणाऱ्या कृषी विभागात महाडीबीटी व पोकरा या योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन अनुदान वाटपात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आता होत आहे. दरम्यान, या भ्रष्टाचार प्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यांसह ३ सुपरवायझर, १ मंडळ अधिकारी, १ कार्यालयीन कर्मचारी अशा एकूण पाच जणांची चौकशीही सुरू झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी विभागांतर्गत सुरु झालेल्या मोका तपासणीची नोंदणी तसेच तुषार व ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना वाटप केलेले साहित्य यातही मोठी तफावत असल्याने हा भ्रष्टाचार उघडकीस आला असल्याची प्राथमिक माहिती या चौकशीतून समोर येत आहे.

पोकरा व महाडीबीटी योजनेअंतर्गत ज्या गावांचा समावेश झालेला आहे, तेथील शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावानंतर संबंधित खात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मान्यता दिली. अनुदान मंजूर होण्यासाठी पदानुसार सर्व्हेक्षण करुन आपल्या जबाबदारी नुसार शेतकऱ्यांच्या शेतात ठिबक व तुषार सिंचनासाठी असलेले साहित्य देणे आवश्यक असते. मात्र, असे होण्यापूर्वीच शेतकऱ्यांशी संपर्क साधत साहित्य न देताच आर्थिक लाभ देण्याची तसेच साहित्य घ्यावयाचे असल्यास त्यातही साहित्य कमी करत टक्केवारी ठरवण्यात आल्याची कागदोपत्री नोंद घ्यावी असे ठरले. याचाच गैरफायदा घेऊन सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर उपकार केल्याचे दर्शवत योजना राबवण्यात आली. मात्र हे होत असताना आपल्या तालुक्यात डीलर किती व त्यांच्याकडून किती साहित्य उपलब्ध होईल? याचा ताळमेळ संबधितांना जमवता आला नाही. त्यातूनच ज्यांना योजनेचा फायदा दिला अशा शेतकऱ्यांची संख्या प्रचंड वाढली व त्या शेतकऱ्यांनी जेथून साहित्य खरेदी केले असे दाखविले.तर डीलर कडे तेवढे साहित्य उपलब्धच झाले नसल्याचे यानिमित्ताने उघड झाले. त्यानंतर वरिष्ठांनी संबंधितांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू केली.

ठिबक व तुषार सिंचन योजनेच्या नळ्या या फोटो काढण्यापुरता वापरून चिरीमिरीसाठी तेथून इतर लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आल्या. एवढेच नव्हेतर काही ठिकाणी तेथील नळ्याही काढून उर्वरित शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहे. याच दरम्यान जिल्हा पातळीवर असलेले अधिकारी यांच्याकडे याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली. मात्र ते अधिकारी सेवानिवृत्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांनीही जाण्यापूर्वी या घोटाळ्यातील लाभ मिळावा, हा दृष्टिकोन ठेऊन या भ्रष्टाचाराच्या चौकशीला बगल दिल्याची चर्चा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. तर याचा उहापोह होऊन कारवाई होऊ नये म्हणून, एका माजी आमदाराला पुढे करीत, तथाकथित भ्रष्टाचारी हे सुटका करुन घेणार असल्याचेही विभागात बोलले जात आहे. यामुळे तालुकाच नव्हेतर जिल्हा पातळीवर यंत्रणा सारवासारव करण्याच्या मार्गाला लागल्याचे नाव उघड न करण्याच्या अटीवर काही अधिकारी व कर्मचारी सांगत आहेत.

राठोड यांनी दिली चौकशी सुरू असल्याची कबुली
पूर्व संमती व डीलरकडून शेतकऱ्यांना साहित्य वाटप यामध्ये अनियमितता झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी दिली. तसेच संदर्भात आपली चौकशी सुरु असल्याची कबुलीदेखील त्यांनी या निमित्ताने दिली आहे.

निवृत्त होण्यापूर्वीच चौकशी लावली
जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी पदाचा नुकताच पदभार स्वीकारला अाहे. माझ्या अगोदर असलेले नाईक यांनी या भ्रष्टाचारासंदर्भात निवृत्त होण्यापूर्वीच चौकशी लावली आहे.
संतोष डाबरे,जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

बातम्या आणखी आहेत...