आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणी:जिल्ह्यातील 261 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आज मतमोजणी

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर मंगळवारी, दि. २० मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतरच ग्रामपंचायतींचा ‘गुलाल’ कोणाचा हे स्पष्ट होणार आहे. मतमोजणीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून, जिल्ह्यातील १३ तालुक्यांत एकूण ९१ टेबलवर ही प्रक्रिया पार पडणार आहे.

जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या २७९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. परंतु, नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सरपंचपदाच्या २१ आणि ग्रामपंचायत सदस्यपदाच्या ७३५ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे उर्वरित जागांसाठी रविवारी, दि. १८ मतदान झाले. सरपंचपदाच्या २५१ जागांसाठी, तर सदस्यपदाच्या एक हजार ५४७ जागांसाठी एकूण ८४२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हाभरात एकूण ३ लाख ३ हजार ४९० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानुसार एकूण ८०.४७ टक्के मतदान झाले. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होती. जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.

मतदानानंतर उमेदवारांसह नागरिकांना निवडणूक निकालाची प्रतीक्षा असून, मंगळवारी मतमोजणी होऊन गावाचे कारभारी ठरणार आहेत. मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली असून, कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसह चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात मतमोजणीसाठी एकूण ९१ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या नियोजित वेळेपूर्वी उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासोबतच मतमोजणीच्या ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे निवडणूक निकालाचे चित्र दुपारी तीनपर्यंत स्पष्ट होणार असल्याचा अंदाज यंत्रणेकडून वर्तवण्यात आला आहे.

ग्रामीण भागात निकालाची उत्सुकता शिगेला ग्रामीण भागात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राजकीय पक्षांचा थेट सहभाग नसला तरी उमेदवारांच्या माध्यमातून वर्चस्व मिळवण्यासाठी नेत्यांनी आधीपासूनच तयारी चालविली आहे. या निवडणूक निकालावरून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे, त्यामुळे तालुका व जिल्हा स्तरावरील राजकीय नेतेही निकालाकडे लक्ष ठेवून आहेत.

प्रशासनाची अशी आहे मतमोजणीची तयारी
तालुका ग्रामपंचायती टेबल

बुलडाणा १० ९
चिखली २३ ९
दे. राजा १७ ६
सिं. राजा २९ ९
मेहकर ४७ ९
लोणार ३८ १२
खामगाव १६ ५
शेगाव १० ३
ज.जामोद १८ ६
संग्रामपूर १९ ७
नांदुरा १३ ५
मोताळा ११ ५
मलकापूर १० ६
एकूण २६१ ९१

बातम्या आणखी आहेत...