आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्कार:पिंपळगावराजाचे जवान श्रीकांत सातव यांच्यावर अंत्यसंस्कार; मुलगी श्रावणीने दिला मुखाग्नी, घोषणांनी दणाणला परिसर

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सुरक्षा बलात कार्यरत असलेले पिंपळगाव राजाचे भूमिपुत्र, भारतमातेचे वीर जवान श्रीकांत सातव यांच्यावर गुरुवारी सकाळी ९ वाजता सहकार विद्या मंदिर नजीक शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची मुलगी श्रावणीने त्यांना मुखाग्नी दिला.

तालुक्यातील पिंपळगावराजा येथील श्रीकांत सातव हे भारतीय सुरक्षा बलाचे जवान होते. बीएसएफ मध्ये त्यांनी २० वर्षे सेवा दिली. सेवानिवृत्तीचे वर्ष असताना त्यांनी आणखी एक वर्ष वाढवून घेतले होते. भारतमातेच्या रक्षणासाठी ते सेवा देत असताना प्रकृती ठीक नसल्याने त्यांना अचानक भारतीय सैन्य दलाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ही दुर्दैवी घटना २९ मे रोजी पश्चिम बंगाल येथे भारतीय सैन्य दलाच्या निवासस्थानी घडली. बीएसएफचे जवान श्रीकांत सातव यांचे पार्थिव आज सकाळी नऊ वाजता जिल्ह्यात पोहोचले.

जवान श्रीकांत सातव यांना श्रावणी व वाणी या दोन कन्या असून आई, पत्नी व भाऊ असा परिवार आहे. या ठिकाणी ठाणेदार सतीश आडे यांनी योग्य ते नियोजन केले होते. यावेळी माजी आमदार दिलीप सानंदा, ज्ञानेश्वर पाटील, आमदार आकाश फुंडकर, जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी पिसे, ग्रामविकास अधिकारी विनोद चव्हाण, सरपंच शेख शाकिर शेख चांद यांची उपस्थिती होती.

जवान श्रीकांत सातव यांचे पिंपळगावराजा येथे स्मारक व्हावे
जवान श्रीकांत सातव यांचे पिंपळगाव राजा येथील शासकीय जागेत वा इतर ठिकाणी स्मारक बांधावे, अशी अपेक्षा अंत्यविधीसाठी आलेल्या प्रत्येक समाज बांधवाकडून व्यक्त केल्या जात होती. स्थानिक लोकप्रतिनिधी या कडे लक्ष देऊन शासनस्तरावरून हे स्मारक घोषित करावे, अशी मागणी सुद्धा नागरिकांनी यावेळी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.

सैनिकाच्या कुटुंबास मदत देणार
येथील बीएसएफचे जवान श्रीकांत सातव यांच्या दुर्दैवी निधनाने त्यांच्या कुटुंबात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाईल.त्यांच्या कुटुंबाला दु:खातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो. लवकरच त्यांना आर्थिक मदत दिली जाईल.
दिलीप सानंदा, माजी आमदार

दोन्ही मुलींचे अभियांत्रिकीचे शिक्षण मोफत करणार
जवान श्रीकांत सातव यांच्या दोन्ही मुलींचे इंजिनिअरिंगचे शिक्षण माऊली इन्स्टिट्यूट मध्ये मोफत करणार असून भारतमातेचे वीर जवान श्रीकांत सातव यांच्या कुटुंबाला मदत करणार.
-ज्ञानेश्वर पाटील

बातम्या आणखी आहेत...