आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा कहर:बुलडाणा जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी; 199 जण पॉझिटिव्ह

बुलडाणा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी राममूर्ती यांनी मास्क न घालणाऱ्यांचा समाचार घेतला. - Divya Marathi
जिल्हाधिकारी राममूर्ती यांनी मास्क न घालणाऱ्यांचा समाचार घेतला.

सातत्याने कोरोना बाधितांची होणारी वाढ व त्यातच १९९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्यावर संचारबंदीचे संकट पुन्हा आले आहे. गेल्या पंधरा दिवसात ९७१ रुग्ण आढळून आल्यामुळे हे संकट येणार असतानाही नागरिक मात्र बेशिस्तीत वावरत होते. अखेर संचारबंदी लागू केल्याचे आदेश काढल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच शहरात रस्त्यावर येऊन मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान काही जणांना गुलाबपुष्प देऊनही समज देण्यात आली.

१७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वाजेनंतर संचारबंदीला सुरुवात झाली आहे. या आदेशानुसार शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदी असणार आहे. आदेशान्वये शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरूपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ ५० व्यक्तिंनाच परवानगी असेल. मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक प्रशासन व पोलिस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. लग्न समारंभाकरिता केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थित राहता येणार आहे. या समारंभांमध्ये सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. लग्नसमारंभाकरिता रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी अनुज्ञेय असेल. याबाबत स्थानिक प्रशासन व पोलिस विभाग आवश्यक ती कार्यवाही करणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती दिसून आल्यास आयोजक व मंगल कार्यालय, हॉल, लॉन मालक यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.

हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. े नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यावसायिक, दुकानदार यांचेवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था, स्थळे यांनी त्यांच्या धार्मिक संस्थानांमध्ये, कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा बंद
जिल्ह्यामधील इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंत असलेल्या सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. या कालावधीत ऑनलाइन/ दूरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील. खासगी आस्थापना, दुकाने या ठिकाणी मास्क, फेस कव्हर असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. तसेच हॉटेलमध्ये सुद्धा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आल्यास स्थानिक प्रशासन दंडात्मक कार्यवाही करेल.