आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर पंचायतीचे दुर्लक्ष:शहरातील मोकाट जनावरांचे नागरिकांवर जीवघेणे हल्ले

मोताळा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून नगर पंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. शहरातील मुख्य मार्गावर मोकाट जनावरांचे घोळके फिरत आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. या मोकाट जनावरांमुळे लहानमोठे अपघात सतत घडत आहे. तसेच मोकाट जनावरे ही नागरिकांवर जीवघेणे हल्ले करीत आहेत. त्यामुळे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिक करत आहे.

मागील बऱ्याच दिवसांपासून शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला असून शहरातील आठवडी बाजार ते बस स्थानक या मुख्य मार्गावर हे मोकाट जनावरांचे घोळके फिरताना दिसून येतात. ही मोकाट जनावरे आपसात मारमारी करत हैदोस घालतात. त्यामुळे रहदारीस अडथळे निर्माण होतात. मोकाट जनावरांमुळे लहान-मोठे अपघात हे नेहमी घडत आहेत. एवढेच नव्हे तर ही मोकाट जनावरे नागरिकांच्या अंगावर चवताळून जाऊन हल्ला करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी शहरातील अर्जुन धांडे यांच्यावर मोकाट जनावराने हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात जवळपास पंचवीस दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोकाट जनावरांमुळे त्यांना प्राण गमवावे लागले. अशी माहिती त्यांच्या परिवाराने दिली आहे.

मोकाट जनावरांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रस्त्यावर घोळकेच्या घोळके फिरत असलेल्या या मोकाट जनावरांमुळे विद्यार्थ्यांसह वाहनधारक, वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहेत.

तसेच शहरात मोकाट फिरत असलेल्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत कालीन असलेला कोंडवाडा हा जमीनदोस्त झाला आहे. शहरात कोंडवाडाच नसल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त होणार कसा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. या गंभीर विषयाकडे लोकप्रतिनिधींसह नगर पंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

येथील कोंडवाडा जीर्ण झाल्यामुळे त्याला पाडण्यासाठी ठराव घेण्यात आला आहे. तसेच नवीन कोंडवाडा बांधण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे कोंडवाडा बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. निधी उपलब्ध होताच सभेत ठराव घेऊन कोंडवाडा बांधण्यात येईल. -मयुर इकडे, बांधकाम अभियंता

कोंडवाडा झाला जमीनदोस्त
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायती जवळ वेशीला लागून कोंडवाडा बांधण्यात आला होता. परंतु काही वर्षांपासून येथील कोंडवाड्याची दुरावस्था होऊन हा कोंडवाडा जमीनदोस्त झाला आहे. या गंभीर विषयाकडे लोकप्रतिनिधींसह नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी नव्याने कोंडवाडा बांधावा, अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...