आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये जिल्हाभरातील ३७ हजार ४२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर यंदाच्या शैक्षणिक वर्षात अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एकूण ४९ हजार ६८० जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी १० हजार ८५८ जागा रिक्त राहणार अाहेत. तर अकरावीच्या प्रवेशासाठी जिल्ह्यात विद्यार्थी संख्या कमी राहणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांना हवे त्या महाविद्यालयात व शाखेत प्रवेश घेणे सोयीचे जाणार आहे. बहुतांश विद्यार्थी व पालकांचा विज्ञान शाखेकडे कल दिसून येत असला तरी कमी टक्केवारी असलेल्या विद्यर्थ्यांना प्रवेश नाकारले जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे.
कोरोनाच्या ऑनलाइन परीक्षेनंतर यंदाची दहावीची परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली होती. त्यामुळे पालकांची निकालाबाबत उत्सुकता वाढली होती. ही उत्सुकता १७ जून शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता निकाल लागल्यानंतर कुठे आनंदाच्या तर कुठे नाराजीच्या स्वरुपात दिसून आली. जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.३९ टक्के इतका लागला असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.४२ टक्के आहे.
तर मुलांचे प्रमाण ९५.४२ टक्के आहे. प्रावीण्य श्रेणीत १९७९९ तर प्रथम श्रेणीत ११९७५, द्वितीय श्रेणीत ४२०३ व उत्तीर्ण श्रेणीत ८३४ विद्यार्थी आहेत. या शैक्षणिक वर्षात २१ हजार ७२३ मुले व १७ हजार ५०६ मुली असे एकूण ३९ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी २१४९३ मुले व १७३२९ मुली अशा ३८ हजार ८२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये २९ हजार ५४१ मुले व १६ हजार ८८२ मुली असे एकूण ३७ हजार ४२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या निकालात अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा हा पहिल्या क्रमांकावर होता तर दहावीच्या निकालात दुसऱ्या स्थानावर आला आहे. दहावीचा शून्य टक्के निकाल लागलेल्या खामगाव तालुक्यातील दोन शाळा आहेत. त्यामध्ये चितोडा उर्दू हायस्कूल व निवासी मूकबधिर स्कूल खामगावचा समावेश आहे.
अमरावती विभागातून दहावीच्या निकालात बुलडाणा दुसऱ्या स्थानावर असला तरी बहुतांश शाळेच्या निकालाची टक्केवारी ९५ % च्या पुढेच आहे. त्यात मलकापूर ९८.५७%,सिंदखेडराजा ९८.३८%,देऊळगावराजा ९८.२२%,मेहकर ९७.९४%, चिखली ९७.६१%, बुलडाणा ९७.१९%, शेगाव ९७.०९%,मोताळा ९६.६६%,लोणार ९६.५१%,खामगाव ९६.४५%,संग्रामपूर ९६.३४%,जळगांव जामोद तालुक्याची ९५.६३ % इतकी तर नांदुरा तालुक्याची ९५.३०% इतकी टक्केवारी आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.