आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेजबाबदारपणा:21 महाविद्यालयांच्या विलंबामुळे 1,058 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; समाजकल्याण विभागाने 14 मेचा दिला होता अल्टिमेटम

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील एकवीस महाविद्यालयांनी एक हजार ५८ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्जच सादर न केल्याने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली आहे. वारंवार सूचना करुनही महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांचे अर्ज सादर केले जात नसल्याचा प्रकार घडत आहे. परिणामी १४ मे हा शेवटचा अल्टिमेटम समाज कल्याण विभागाकडून देण्यात आला आहे. महाविद्यालयीन इतर मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही थकीत आहे. काही महाविद्यालयांनी अर्ज सादर करुनही इतर मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती अद्याप खात्यात जमा झाली नाही. सावित्रीाबाई फुले शिष्यवृत्तीची ही अशीच परिस्थिती आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गाचे सन २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी प्रणालीवरील महाविद्यालय स्तरावरील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज तत्काळ निकाली काढण्याबाबत समाज कल्याण विभागाकडून संबधित महाविद्यालयांना सूचित करण्यात आले होते. तरीही त्यांनी अर्ज प्रलंबित ठेवले आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहुजन कल्याण इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी परीक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो.

सदर योजनेंतर्गत महाडिबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन केलेेले अर्ज महाविद्यालय स्तरावर पाठवले जातात. महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर प्राप्त अर्जाची तपासणी करुन शिष्यवृत्तीकरिता पात्र अर्ज समाज कल्याण विभागाला पाठवणे आवश्यक आहे तर त्रुटी असलेले अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉग इनला परत करणे आवश्यक आहे.

परंतु वारंवार सूचना देऊनही जिल्ह्यातील एक हजार ५८ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज तपासणी करून पात्र अर्ज हे सहायक आयुक्त समाज कल्याण, बुलडाणा यांच्या लॉग इनला १४ मे पर्यंत पाठवण्याचा व त्रुटी असलेले अर्जाची पूर्तता करण्याचा अल्टीमेटम समाज कल्याणने दिला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्यास नियमानुसार कार्यवाही करण्याचा इशाराही समाज कल्याण विभागाने दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...