आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:आडविहीर ते महालपिंप्री मार्गावरील शेतरस्त्याची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

मोताळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून आडविहीर ते महालपिंप्री या शेतरस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून या मार्गावरील रस्ता खोल झाल्याने दुरुस्तीसाठी नागरिकांनी पुढाकार घेत हा रस्ता लोक वर्गणीतून करण्याचे ठरवले होते. तसेच चार वर्षांपूर्वी या रस्त्याची मोजणी करून देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती. परंतु या मागणीची प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. तालुक्यातील आडविहीर ते महालपिंप्री या शेत रस्त्याची मागील बऱ्याच वर्षांपासून अतिशय दुरवस्था झाली आहे. या मार्गावर शेती असलेले शेतकरी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या मार्गावरून शेतात जाताना तसेच शेतमाल आणताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शेत रस्ता जमिनीपासून खोल झाल्यामुळे पावसाळ्यात हा शेत रस्ता चिखलमय होतो. त्यामुळे या रस्त्यात बैलगाड्या फसतात तर कधी कधी बैलगाड्या पलटी होण्याच्या घटना घडतात. चिखलमय रस्त्यातून शेतकऱ्यांना वाट शोधावी लागते. त्यामुळे या रस्त्यावरून शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अशा जीवघेण्या रस्त्याने शेतमाल आणताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

वास्तविक पाहता या शेत रस्त्यासाठी मागील २०१८ मध्ये तत्कालीन सरपंच दत्तनिवास नारखेडे यांच्या कार्यकाळात हा शेत रस्ता खोल झाल्यामुळे या रस्त्याचे मातीकाम लोकवर्गणीतून करण्याचा ग्रामपंचायतीने ठराव घेतला होता. तसेच आडविहिर ते महालपिंप्री हा रस्ता लोकवर्गणीतून तथा स्वखर्चातून करण्यासाठी रस्त्याच्या कडेला लागून शेती असलेल्या शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज करून शेतरस्त्याचे स्थळ निरीक्षण करून मोजणी करून देण्यात यावी जेणेकरून शेतरस्त्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे नुकसान होणार नाही. अशी मागणी केली होती. एवढेच नव्हे तर तत्कालीन सरपंचाने सुद्धा हा रस्ता मोकळा झाल्यास शेतकरी लोकवर्गणीतून तथा स्वखर्चाने हा शेत रस्ता करण्यास तयार असल्याचे तहसीलदार यांना पत्राद्वारे सांगितले होते. परंतु तहसील प्रशासनाने मागणी व पत्राची दखल घेतली नाही.

परिणामी शेतकऱ्यांना आजही या चिखलमय तथा जीवघेण्या रस्त्याने शेतमाल आणावा लागत आहे. या रस्त्याचा प्रश्न कधी व कसा सुटणार या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. शेतकऱ्यांची हेळसांड थांबवण्यासाठी या रस्त्यासह इतर शेत रस्त्याचे मातीकाम तथा खडीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

शेत रस्त्याची मोजणी करण्यात यावी
आडविहिर ते महालपिंप्री रस्त्याचे काम हे लोकवर्गणीतून तथा स्वखर्चातून करण्यासाठी या रस्त्याची मोजणी करून देण्यासाठी चार वर्षांपूर्वी प्रशासनाला निवेदनातून मागणी करण्यात आली होती. परंतु प्रशासनाने निवेदनाची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आतातरी खडीकरण हे धडक योजनेतून करून देण्यात यावे. -दत्तनिवास नारखेडे, माजी सरपंच आडविहिर

शेतरस्त्याचे खडीकरण त्वरील करण्यात यावे
आडविहिर ते महालपिंप्री या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरील शेतकऱ्यांना घरी शेतमाल आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून बैलगाडी चालवणे खूप कठीण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी या रस्त्यात दोन महिलांचे हात मोडल्या गेले होते. त्यावेळी या रस्त्याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी आडविहिर गावाला भेट देऊन शेतरस्त्याची पाहणी करण्याची मागणी केली होती. परंतु अद्यापही या मागणीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेत रस्त्याचे मातीकाम व खडीकरण करण्यात यावे.-अर्चना विनोद फाटे, शेतकरी आडविहिर.

बातम्या आणखी आहेत...