आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रारब्धाचा ठेवा, संचिताचा ठेवा कधीही चुकणार नाही. परंतु नशीब हे प्रभू रामरायाच्या आणि सद्गुरूंच्या स्वाधीन करून द्या आणि निर्भयपणे जगा. प्रत्येकाचा प्रपंच आज अडचणीत आहे. असून सुद्धा सुखी नाही आणि नसून सुद्धा सुखी नाही, अशी स्थिती सर्वत्र आहे. हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे ईश्वर चिंतन सोडू नका, ईश्वर चिंतनाचा मनापासून ध्यास घ्या, असे मार्गदर्शन समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराज यांनी केले. प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी साडेतेरा कोटी रामनाम जप संकल्पपूर्ती यज्ञ सोहळा समर्थ सद्गुरु श्रीहरी महाराज यांच्या आशीर्वादाने राम उपासक मंडळाच्या वतीने शहरातील आरास ले आउट भागातील हनुमान मंदिराच्या प्रांगणात आयोजित केला होता.
तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमात ईश्वर निष्ठांची, भाविकांची मांदियाळी जमली होती. २ फेब्रुवारीला महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली. याप्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान समर्थ सद्गुरु श्रीहरी महाराजांनी भाविकांना कापड प्रसादाचे वितरणही केले. या वेळी मुख्य मार्गदर्शन करताना समर्थ सद्गुरु श्रीहरी महाराज म्हणाले, की देव, दानव आणि मानव यांचा कलह संपणार नाही. देवाचे नाव घेणाऱ्यांनाही आज नाव ठेवले जात आहे, शिव्या घातल्या जात आहेत. आपापसात प्रेम-भाव वाढवा.
प्रपंच सोडू नका तो, नेटाने करा. आज मुले-मुली आईवडिलांचे ऐकत नाहीत. वृद्धांना घराबाहेर काढले जात आहे. त्यामुळे संस्काराचे बीजारोपण आवश्यक करा. भगवंत दयाळू आणि कृपाळू आहे. तो कृपा करेलच. प्रत्येकाच्या मनात ईश्वराचा, देवाचा अंश आहे. आत्मा हाच परमात्मा आहे. आज संतांमध्ये देखील भेदाभेद करण्यात येत आहे. मुळात सर्व संत एकच आहेत. आणि ईश्वराच्या प्राप्तीचाच मार्ग त्यांनी दाखवला आहे.
ईश्वरावर मनापासून श्रद्धा ठेवा आणि निर्भयपणे जगा, दररोज त्याचे नामस्मरण आवर्जून करा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. तत्पूर्वी, पहाटे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मलकापूर येथील डॉ. व्ही. के. जोशी यांचे प्रवचन व गुलाल कार्यक्रम पार पडला. सकाळी ८ वाजता श्रीहरी महाराजांच्या हस्ते यज्ञ पूर्णाहुती देण्यात आली. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली महाराज निरपूरकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी नैवेद्य आरती झाल्यावर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.