आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोजन वाटप:ठेकेदाराकडून नोंदणीकृत कामगारांना निकृष्ट दर्जाचे किट अन् भोजन वाटप

लक्ष्मीकांत बगाडे | बुलडाणा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वाटप करण्यात येत असलेल्या पेटीसहीत कीट निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप होत आहे. ही कीट जवळपास ५३ हजार ३६८ कामगारांना ऑनलाइन वाटप करण्यात आली आहे. या किटबाबत संघटनांच्या तक्रारी असून माध्यान्ह भोजनाबाबत ही रुचकर जेवणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर आरोग्यासाठी मिळणारी सुविधाही नीट मिळत नाही. नावापुरतीच शिबिरे घेऊन तीस हजार ६२८ पैकी एक हजार ९०१ कामगारांनाच त्याचा फायदा झाला आहे. या सर्व सुविधा परराज्यातून व राज्याच्या ठेकेदाराकडून मिळत असल्याने तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कामगार संघटना व सामाजिक कार्यकर्त्या या नावाखालीही दबाव टाकला जात आहे.

महाराष्ट्र कामगार व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी करुन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑनलाइन पद्धतीने दिले जातो. कामगारांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने कामगार मंडळाच्या संकेतस्थळावर केली जाते. जन्माचा पुरावा, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह ओळखपत्रांचा पुरावा, बँक पासबुकची छायाप्रत, आधार संमती पत्र, स्वयं घोषणा पत्र व मागील वर्षात ९० दिवस अथवा त्याहून जास्त दिवस बांधकाम केल्याचे प्रमाणपत्र सादर करुन अर्ज करावा तसेच नूतनीकरण करता येते. नोंदणीकरिता ऑनलाइन शुल्क भरावे लागते.

अशा नोंदणीकृत केलेल्या कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात २७ हजार ९७३ कामगारांना योजनांचा लाभ मिळाला लाभाची रक्कम डीबीटी पद्धतीने परस्पर मंडळ स्तरावरुन बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा करते. माध्यान्ह भोजन व पेटी ही त्यांना कंत्राटदारांकडून मिळत असून याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

कीटचा वापर करत नाही
जी कीट कामगारांना दिली जात आहे. ते निकृष्ट असल्याने त्याचा वापर बांधकाम कामगार करत नाहीत. मध्यान्ह भोजनही वेळेवर मिळत नाही. भोजन वाटप करण्याऐवजी कामगारांच्या खात्यात भोजनाचे पैसे जमा करावे.
-सुधाकर माऊली, बांधकाम मिस्त्री, संगम तलाव, बुलडाणा

दलाली बंद करावी
अटल घरकुल योजना प्रभावीपणे राबवावी, बांधकाम कामगारांच्या पाल्याच्या शैक्षणिक अर्थसहायात वाढ करावी, कामगार संघटनांची चौकशी करावी, संघटनांच्या नावे कार्यालयातील कर्मचारी यांच्यावर दबाव टाकून धमक्या देणे व दलाली करणाऱ्या संघटना कायमस्वरुपी बंद व्हाव्या. नियुक्त अकरा सदस्यांची माहिती कार्यालयात उपलब्ध असावी. -बबन गाढे, संभाजीनगर, बुलडाणा

पाच हजारांची कीट ११ हजार ४०० रुपयांत
बांधकाम कामगारांना वाटप करण्यात आलेली कीट निकृष्ट दर्जाची आहे. जे सामान बाजारात दोनशे ते हजार रुपयांपर्यंत मिळू शकते. ती ११ हजार चारशे रुपयात कंत्राटदाराला मिळत आहे. आरोग्य शिबिरही अद्याप झाल्याचे ऐकिवात नाही. मध्यान्ह भोजनही बेचव असते व ते वेळेवर मिळत नाही. कीटमध्ये हातमोजे, चटई, टिफीन, टॉर्च, हेल्मेट, बॅग, वॉटर बॅग, सेफ्टी बेल्ट आहे. कामगार मंडळ कार्यालयातही कंत्राटी कर्मचारी हे मंडळाकडून भरतात ते संघटनांकडून भरल्यास वेळेत काम होऊन बांधकाम मजुरांच्या मुलांनाही न्याय मिळू शकतो. -मधुकर जोगदंड, अध्यक्ष बुलडाणा जिल्हा मजदूर संघटना

बातम्या आणखी आहेत...