आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसाठा वाढणार:जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली जलसंधारणाच्या विविध कामांची पाहणी

वाशीम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कामे वेळेत पूर्ण करण्याचे दिले निर्देश; इतर कामेही प्रगतीपथावर

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी वाशीम तालुक्यातील काटा आणि मंगरूळपीर तालुक्यातील तपोवन व घोगरी येथील जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. सदर कामे जून २०२२ अखेर पुर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर व उपविभागीय जलसंधारण अधिकारी वाघमारे उपस्थित होते.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत जिल्ह्यात जलसंधारणाची १७१ कामे मंजूर आहे. यातील २०१८-१९ मधील ८७ कामे आकांक्षित जिल्हा म्हणून मंजूर केली आहे. त्यासाठी ८५ कोटी रुपये निधी मंजूर झाला. त्यापैकी १३ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे सुरु आहेत. तसेच इतर कामे प्रगतीपथावर आहेत.

वाशीम तालुक्यातील काटा येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ११ लाख रुपये किमतीचे सिमेंट साठवण बंधाऱ्याचे बांधकाम पुर्ण झाले आहे. तसेच खोलीकरणाचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण होताच पावसाळ्यात ४ सहस्त्र घनमीटर पाणीसाठा या बंधाऱ्यांत होणार आहे. त्यामुळे परिसरातील भूगर्भातील पाणी साठ्यात वाढ होऊन विहिरी व बोअरच्या पाणी पातळीत वाढ होईल. त्यामुळे सिंचन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. अशाच प्रकारचे आणखी दोन सिमेंट साठवण बंधारे तयार करण्यात यावे, अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन येथून वाहणाऱ्या अडाण नदीवर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या व्दारयुक्त सिमेंट साठवण बंधाऱ्याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. या साठवण बंधाऱ्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. खोलीकरणाचे काम त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंधारण अधिकाऱ्यांना यावेळी दिले. खोलीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर उपलब्ध पाणी साठ्यातून परिसरातील ४५ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे. नदीमध्ये जवळपास दीड किलोमीटर अंतरापर्यंत बंधाऱ्यापासून पाणीसाठा राहणार आहे. जवळपास ७० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा या नदीवरील बंधाऱ्यांत उपलब्ध असणार आहे.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद अंतर्गत आकांक्षित जिल्हा म्हणून वाशीम जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये ८७ कामे मंजूर होती. त्यासाठी ८५ कोटी रुपये निधी मंजूर झाला. परंतु, कोरोनामुळे ही कामे सुरु होण्यास विलंब झाला. त्यातील १३ कामे पुर्ण झाली आहे. उर्वरित कामे सुरु आहे. २०१८-१९ या वर्षात सर्वसाधारण नियोजनातील ४२ कोटीची ४७ व्दारयुक्त सिमेंट बंधाऱ्याची कामे मंजूर आहे. त्यापैकी २३ कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. २०२०-२१ या वर्षात रिसोड आणि मालेगाव तालुक्यासाठी ४२ कोटीची ३७ कामे मंजूर झाली असून ही कामे लवकरच सुरु होणार असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी आकोसकर यांनी दिली.

संरक्षक भिंतीच्या कामाची पाहणी : शेलूबाजार जवळील घोगरी येथे अडाण नदीच्या काठावर जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून सुरु असलेल्या पूर संरक्षक भिंतीच्या कामाची पाहणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. या कामावर ११ लक्ष रुपये खर्च होणार असून ५० टक्के काम पुर्ण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...