आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतीला सिंचनाची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल तेव्हाच विदर्भातील शेतकरी आत्महत्येचा डाग पुसला जाईल हे वास्तव आहे. यासाठी वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प देखील महत्त्वाचा ठरणार आहे. याच नदीजोड प्रकल्पाच्या पैनगंगे पर्यंतच्या विस्तारीकरण झाल्यास बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ मुक्तीचे वरदान लाभेल, अशी मागणी केंद्रीय ग्रामविकास समिती चे अध्यक्ष खा.प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली. दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी हा पाणीदार प्रश्न सिंचन सुविधेच्या दृष्टीने खा. जाधव यांनी नियम ३७७ अन्वये उपस्थित करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासह शेती आणि उद्योग भर भराटीला मदत करणारा ‘’वैनगंगा-नळगंगा’’ नदी जोड प्रकल्प शासनाकडे प्रस्तावित आहे. यात सर्वेक्षण मंजुरी मिळाली आहे. पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. सिंचन अनुशेष मोठा आहे. खरिपाचे पीक हातून गेल्यावर आर्थिक संकट उभे राहते आणि शेतकरी आत्महत्या वाढतात. नदीजोड प्रकल्प हा गोदावरी खोऱ्यातील प्राणहिता उपखोऱ्यातून वैनगंगा नदीमधून महाराष्ट्राच्या वाट्याचे वाया जाणारे पाणी तापी खोऱ्याच्या पूर्णा उपखोऱ्यापर्यंत वळते करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे विदर्भातील सात जिल्ह्यांना शेती सिंचन व बिगर सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीवरील धरणात वळते करण्याचा हा प्रस्ताव आहे.
वैनगंगा नळगंगा या नदीजोड योजनेतून काही पाणी पैनगंगा नदी मध्ये पेन टाकळी धरणावर देऊन नेहमीच दुष्काळ ग्रस्त असलेल्या दक्षिण बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातील उर्वरित भागांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देता येणं शक्य आहे. यासाठी बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची आग्रही भूमिका आहे. हा मुद्दा लोकसभेत मांडून खासदार प्रतापराव जाधव यांनी ही मागणी रेटून धरली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.