आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:कर्तव्यावर असताना मद्यपान केले, पोलिस अंमलदार डिघोळे निलंबित; आकाश राजगुरु याचे अपघाती मृत्यू प्रकरण

बुलडाणा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आकाश राजगुरू याच्या दुचाकीस धडक देवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला पोलिस अंमलदार दीपक डिघोळे याला पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी निलंबित केले. डिघोळे याने कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

तालुक्यातील धाड पोलिस ठाण्यात कार्यरत अंमलदार दीपक डिघोळे याच्या ताब्यातील पोलिस जीप क्रमांक एम.एच. २८ सी ६४३७ ने दुचाकी क्रमांक एम.एच. २८ ए.पी. ८८८७ ला धडक दिली. यात आकाश पुंजाजी राजगुरु रा. उबाळखेड याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दशरथ शालिग्राम देवकर रा. उबाळखेड हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर राजगुरु यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांत दीपक डिघोळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिस जीपमध्ये असलेल्या पोलिसांनी मद्यप्राशन केले असून त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका राजगुरु यांच्या कुटुंबियांनी घेतल्यामुळे पोलिस अधिकारी व अंमलदाराची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत आरोपी चालक दीपक डिघोळे हा दारुच्या अमलाखाली असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलीन झाल्याने त्याच्यावर बेशिस्त, बेजबाबदार, नैतिक अधःपतन व अशोभनीय गैरवर्तनाचा ठपका ठेवत त्वरीत प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आल्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले. आदेश अस्तित्वात असे पर्यंतच्या कालावधीत पोलिस अंमलदार दीपक डिघोळे यास निलंबन कालावधीत पोलिस मुख्यालय, बुलडाणा येथे ठेवण्यात येत असून त्याला दररोज सकाळ-संध्याकाळी हजेरी लावावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...