आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुणवत्ता असूनही आदिवासी विद्यार्थी केवळ भाषिक अडसरामुळे शालेय शिक्षणात मागे राहतात. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे ही अडचण आता कायमची दूर होणार आहे. अडीच वर्षांच्या संशोधनातून राइज फाउंडेशनने पाच भागात पावरी भाषा कोश साकारला असून रविवार, ७ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद येथे या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
सुमारे साडेचार हजार शब्दांचा समावेश असणाऱ्या या भाषाकोशमुळे पावरा समाजातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी मातृभाषा, राज्यभाषा, राष्ट्रभाषा अन् ज्ञानभाषा इंग्रजीतील शब्दसंग्रह उपलब्ध होणार आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, धुळे या आदिवासीबहुल जिल्ह्यात कोरकू, भील्ल, पावरा, निहाल, भिलाला समाजाचे वास्तव्य आहे. या विद्यार्थ्यांची मातृभाषा वेगळी असल्याने मराठीतील पुस्तके त्यांच्यासाठी फारशी उपयुक्त ठरत नाहीत, हे वेळोवेळी समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना वाचनाची गोडी लागावी, याकरिता स्वतंत्रपणे विचार करणे गरजेचे बनले होते. मेळघाटातील आदिवासींसाठी कार्यरत राइज फाउंडेशनने ही गरज ओळखून २०१८ मध्ये कोरकू विद्यार्थ्यांसाठी बहुभाषी शब्दकोश तयार केल्यानंतर आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांकरिता त्यांच्या मातृभाषेतून पुस्तके साकारण्याची कल्पना पुढे आली. २०१९ मध्ये पावरा विद्यार्थ्यांसाठी विकासाठी राइज फाउंडेशनचे संचालक आचार्य ऋषिकेश खिलारे, प्रकल्प समन्वयक हर्षदा लोंढे-खिलारे यांनी ४५ गावांतील ५०० पेक्षा अधिक ग्रामस्थांशी संवाद साधत अडीच वर्षे संशोधन केले.
पाच खंडांत भाषाकोशाची विभागणी; अर्थबोधासाठी चित्रांचा वापर माझी शाळा, माझा परिसर, माझे जग, माझी संस्कृती व माझा अभ्यास अशा पाच खंडात भाषा कोश विभागला आहे. पावरी बोलीतील प्रत्येक शब्दाचा मराठी, हिंदी आणि इंग्रजी प्रतिशब्द व त्याचा उच्चार भाषा कोश सांगतो. शब्दच नव्हे तर चटकन अर्थबोध व्हावा, यासाठी शब्दांनुसार चित्रेही दिली आहेत. विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, सण-उत्सव, चालीरितींची ओळख व्हावी, यासाठी स्वतंत्रपणे तयार केलेला माझी संस्कृती हा खंड हे या भाषाकोशचे वैशिष्ट्य होय. पावरी बोलींचे स्थानिक अभ्यासगट व पुणे, मुंबई, औरंगाबादेतील ११ जणांच्या भाषा समितीने या सर्व नोंदी तपासून त्यांचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक गटांतील विद्यार्थ्यांच्या भाषिक गरजांनुसार पाच भागात वर्गीकरण केले. ग्रंथाली प्रकाशनाने निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.