आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामार्च, एप्रिल व मे या तीन महिन्याच्या कालावधीत उन्हाची दाहकता, सिंचनासाठी होत असलेला भरमसाठ पाण्याचा वापर, उन्हामुळे होत असलेले पाण्याचे बाष्पीभवन यासह इतर कारणांमुळे या महिन्यात भूगर्भातील पाणी पातळीत घट येत असते. परंतु मागील वर्षी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्याच्या भूगर्भ पातळीत घट न येता उलटपक्षी ते दीड मीटरने वाढल्याची माहिती भूजल वैज्ञानिक विभागाने दिली आहे. भूगर्भ व प्रकल्पातील मुबलक जलसाठ्यामुळे यंदा कित्येक गावाची पाणी टंचाईतून सुटका झाली आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. परंतु मागील वर्षी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर गेला आहे. परिणामी लहान-मोठ्या प्रकल्पात मुबलक जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावाची पाणीटंचाईतून सुटका झाली आहे. जिल्ह्याच्या भूगर्भातील पाणी पातळी मोजण्यासाठी भूजल विभागाच्या वतीने पाण्याचा उपसा नसलेल्या १६७ विहिरी निरीक्षण करण्यासाठी निश्चित करण्यात आल्या होत्या. वर्षातुन चार वेळा भूगर्भातील पाणी पातळीचे निरिक्षण करण्यात येते. मागील मे महिन्यात भूजल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपरोक्त विहिरीचे निरिक्षण केले असता भूगर्भातील पाणी पातळीत घट न येता ती दिड मीटरने वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक वाढ शेगाव तालुक्यात २.५१ व सिंदखेडराजा तालुक्यात २.५४ मीटरने पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर सर्वात कमी मोताळा तालुक्यात नाममात्र ०.०३ मीटरची वाढ झाली आहे. वास्तविक पाहता कधी नव्हे यंदा सूर्याने आग ओकण्यास सुरूवात केली होती. दमदार पावसामुळे बागायती क्षेत्र वाढल्यामुळे सिंचनाचे प्रमाण देखील वाढले होते. त्यामुळे पाणी पातळीत घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु पाणी पातळीची आकडेवारी पाहता ती शक्यता सपशेल फोल ठरल्याचे दिसून येत आहे.
निरीक्षणासाठी निश्चित करण्यात आलेल्या विहिरी
भुगर्भातील पाणी पातळीचे निरीक्षण करण्यासाठी भूजल वैज्ञानिक विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १६७ विहिरी निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील ११, चिखली १४, देऊळगावराजा ११, जळगाव जामोद ७, खामगाव १९, लोणार ११, मलकापूर १०, मेहकर २१, मोताळा १३, नांदुरा १०, संग्रामपूर १४, शेगाव १३ व सिंदखेडराजा तालुक्यातील १३ विहिरीचा समावेश आहे.
अनेक गावांची झाली पाणीटंचाईतून सुटका :
मार्च पासुन जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचे चटके बसत होते. परंतु यंदा भुगर्भासह प्रकल्पात जलसाठा शिल्लक असल्याने अनेक गावांची पाणीटंचाईतून सुटका झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.