आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुसिव्ह:महागाईमुळे बुलडाण्यात सदनिका घेण्याचे अनेकांचे स्वप्न विरले​​​​​​​

लक्ष्मीकांत बगाडे | बुलडाणा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर सर्वच वस्तू महागल्या असताना सदनिका ही महाग झाल्या आहेत. त्यामुळे या सदनिका गोर-गरीबांच्या आवाक्या बाहेरच्या झाल्या आहेत. मध्यमवर्गही त्याचे स्वप्न बघूच शकत नाही. बांधकाम साहित्य, मजुरी, प्रति चौरस बांधकाम दरात झालेली वाढ यासह अन्य कारणे या महागाईच्या मागे आहेत. कोरोना काळात मुद्रांक शुल्कात सूट मिळाली होती. त्यामध्ये वाढ झाल्याचाही परिणाम आहे. पंतप्रधान घरकुल योजनेबाबत मिळणारी सबसिडी संदर्भातही बँकांना काही सूचना नसल्याने त्याचा सुद्धा एक परिणाम होत आहे.

बांधकाम क्षेत्रास लागणाऱ्या मूलभूत सामग्री स्टील, सिमेंट, व मजुरी, वाहतूक खर्च इत्यादींच्या किमतीमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. परिणामी बांधकाम खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचा थेट परिणाम घर खरेदीदारांवर पडणार असून, घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांची ही कसोटीची वेळ आहे. आर्थिक विकासातील एक महत्वाचा घटक म्हणून ही बांधकाम क्षेत्राची ओळख आहे.

कोरोनाचा कठीण काळ गेल्यानंतर सदनिका खरेदी स्वस्त होईल असा अंदाज होता. मात्र इंधन, स्टील, सिमेंट यांच्या वाढत्या किमती या सर्वांचा विपरीत परिणाम बांधकाम खर्चावर होत असून, बांधकाम खर्चात प्रति चौरस फूट ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. सिमेंटचे दर प्रति गोणीमागे ५० रुपयांनी वाढले आहे. स्टील चे दर प्रति किलो ३० ते ३५ रुपयांनी महागले आहे. डिझेलचे दर प्रति लिटर १०० रुपयांपर्यंत झाले आहे. तसेच टाइल्सच्या दरात सुद्धा २० ते ३० टक्के वाढ झाली आहे.

या सर्व दरवाढीचा परिणाम सर्व घरांच्या प्रकल्पावर होत असून जास्त करून परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होईल, असे वाटते. राज्य व केंद्र सरकारने, यामध्ये त्वरित लक्ष घालून सामान्य जनतेचे हितासाठी, वरील बांधकाम सामग्रीची होत असलेली दरवाढ आटोक्यात आणावी, अशी मागणीही आता होऊ लागली आहे.

जमिनीचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर : दिवाळीत सदनिका खरेदीत कल दिसून आला नाही. त्यामुळे नवीन प्रोजेक्टची निर्मितीही झाली नाही. सोयाबीन पाण्यात असल्याने शेतकरीच बाहेर आला नसल्याने चहल-पहल नाही. जमिनीचे भावही वाढले आहेत. रेडी रेकनरचे दर वाढले. त्यामुळे सरकारी भाव वाढल्याने जमिनीचे भाव वाढले. सामान्यांच्या आवाक्याबाहेर याचा खर्च जात आहे. आता कर्जाची लिमिटमध्ये सदनिकेचा बजेट बसत नाही. पंतप्रधान सबसिडी अजून आले नाही. बँकांना पत्र मिळालेले नाही. दोन लाख ६७ हजार रुपये सबसिडी मिळायची त्याचा परिणाम सदनिका खरेदीवर व्हायचा.

रोजगारावरही झाला परिणाम
जवळपास कन्स्ट्रक्शन कॉस्ट वीस ते तीस टक्के वाढल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य घराचे स्वप्न पुर्ण होऊ शकत नाही. केंद्र सरकार म्हणते सर्वांना घर मिळाले पाहिजे. मात्र महागाई वाढल्याने केंद्र शासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जगात सर्वात जास्त रोजगार बांधकाम व्यवसाय आहे. खालच्या वर्गापासून तर प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होतो. सर्वात जास्त गृहनिर्माण उद्योग आहे. --अशोक व्यास, माजी अध्यक्ष, क्रेडाई, बुलडाणा

मुद्रांक शुल्कात सूट द्यावी

महागाईचा उच्चांक वाढल्याने कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढले आहे. ट्रान्सपोर्ट महाग झाले. त्यामुळे कोरोनाच्या आधी ४० ते ५० टक्के होते ते दर आत ६० ते ७० च्या रेंजमध्ये आहे. सिमेंटचे भाव ५० रुपये प्रत्येक बॅगमागे वाढले. प्लम्बीग, सॅनेटरींग ३५ टक्क्याने वाढले. वाळूचे रॉयल्टी प्रत्येक ट्रकमागे पाच ते सहा हजाराने वाढल्या आहे. कोरोना काळात मुद्रांक शुल्क ३ टक्के सूट शासनाने दिली होती. तेव्हा सदनिका घेणारा ग्राहक वाढला होता. आता सहा टक्के मुद्रांक शुल्क व १ टक्के नोंदणी खर्च वाढला असून त्यामुळे व्यवहार कोलमडून चालले आहेत. व्यवसाय अजूनही कंट्रोल मध्ये येत नाही. तेव्हा मुद्रांक शुल्कात शासनाने सूट देण्याचा विचार करावा व देण्यात यावी. - अश्विन सातपुते, अध्यक्ष, क्रेडाई बुलडाणा

असे आहे सदनिकेचे दर
टु बी एच के फ्लॅटची किंमत १५ ते २० होती. आता २५ ते ३० लाखापर्यंत गेली. रो हाऊस २८ ते ३३ लाख होते. आता जाते ३५ ते ४० लाख रुपये पर्यंत जात आहे. त्यामुळे एवढा भार मध्यमवर्गीय लोकांना परवडण्यासारखा नसल्याने सदनिका बनवणे अन् ते विकण्याचा प्रोजेक्ट सध्या अडचणीत सापडला आहे.

बातम्या आणखी आहेत...