आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत विद्यालयाच्या संस्थापिका तथा कलाप्रेमी मुख्याध्यापिका स्व. शशिकलाताई आगाशे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भारत विद्यालय सिनेसृष्टीतील आणि लोककलेतील अनेक कलाकारांच्या मांदियाळीने नटले होते. प्रथम सत्रामध्ये पुरस्कारांचे वाटप झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सुमधुर गीतांचा कार्यक्रम सादर करीत उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. फत्तेशिकस्त, शेर शिवराय, पावनखिंड या गाजलेल्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक असलेले देवदत्त मनीषा बाजी, त्यांचे सहाय्यक आणि उत्तम गझल गायक, गिटार वादक सृजन कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणारे आशाएँ हे गीत गाऊन कार्यक्रमाची सुरूवात केली.
त्यासोबतच मुख्य गायिका व सध्या गाजत असलेल्या वेड या चित्रपटातील मुख्य पार्श्वगायिका निधी हेगडे यांनी आपल्या गोड आवाजात गीतांनी वातावरण प्रफुल्लित केले. संस्था सचिव तथा गायक अंगद आगाशे यांनी स्वता लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले गीत सादर करून रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणारे व सुमारे चाळीस वाद्य लीलया वाजवणारे नागेश भोसेकर यांनी आपल्या तबल्यातील कौशल्याने उपस्थितांना स्तिमित केले.
यावेळी त्यांनी आफ्रिकेतून आणलेल्या कोहाम या वाद्याचा परिचय उपस्थितांना करून दिला. त्यानंतर त्यांनी तबला सोडून इतर वाद्येही वाजवून दाखवली. यावेळी भारत विद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेल्या चेतन पाटील यांनी तबल्यावर साथ दिली. यावेळी उपस्थित कलावंतांनी उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या गीतांची सांगता विद्यार्थ्यांच्या सोबत वंदे मातरम आणि माँ तुझे सलाम या गीताने करून भारत विद्यालयात पुन्हा येण्याचे व हा ऋणानुबंध असाच दृढ करण्याचे आश्वासन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.