आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासकाळचा चहा करण्यासाठी गॅस सिलिंडर सुरू केले असता अचानक त्या सिलिंडर टाकीचा स्फोट होवून घराला आग लागली. या आगीत घरातील धान्य, कपडे व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत घरमालकाचे जवळपास अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. ही घटना आज ३ मे रोजी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास येथील वॉर्ड क्रमांक दोन मध्ये घडली.
येथील परसराम भागाजी नागरे हे आपली पत्नी सुलभा, दोन मुले व एका मुलीसह वॉर्ड क्रमांक दोन मध्ये राहातात. दरम्यान आज सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी सुलभा यांनी चहा करण्यासाठी गॅस सिलिंडर सुरू केले असता अचानक गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन घराला आग लागली. या आगीत घरातील टीव्ही, फ्रीज, कूलर, मिक्सर, अन्नधान्य, कपडे व इतर साहित्य जळून खाक झाले. गॅस पूर्ण पेटल्यामुळे सुलभाबाई या तातडीने घराच्या बाहेर पडल्या.
त्यामुळे त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. या गॅस सिलिंडरचा स्फोट एवढा भीषण होता की, या स्फोटामुळे घरावरील टीन पत्रे दहा ते पंधरा फुट उंच उडून बाहेर पडली. घरमालक परसराम नागरे यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. परसराम नागरे यांनी या घटनेची माहिती अंढेरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच ठाणेदार गणेश हिवरकर, वाघ, बीट जमादार सोनकांबळे, तलाठी एम. के. जारवाल, कोतवाल भगवान ढोले, संजय मोरे, सुभाष जायभाये, ग्रामसेवक मोरे यांनी पाहणी करत पंचनामा केला. ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.