आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनावर तोडगा काढण्याची गरज:ऐन उन्हाळ्यात शहरातील विस्कळीत होणाऱ्या पाणी पुरवठ्याला भारनियमनामुळे ‘ग्रहण’, पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले; पाइपलाइनलाही गळती

खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या शहराच्या विस्कळीत पाणी पुरवठ्याला गत आठवडाभरापासून गेरु माटरगाव येथे होणाऱ्या भारनियमनाचे ‘ग्रहण’ लागले आहे. जोपर्यंत हे ग्रहण सुटत नाही तोपर्यंत शहरवासीयांना मुकाट्याने याचा सामना करावा लागणार आहे.

ऐन उन्हाळ्याच्या दिवसातच असा प्रकार कसा होतो? असा प्रश्न शहरवासीयांतर्फे उपस्थित केला जात आहे. यावर येथील नगर पालिकेचे अधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून भारनियमनावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

खामगाव शहराला गेरु माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणातील पाणी पाइपलाइनद्वारे येथील जळकाभडंग गावाजवळील जलशुद्धीकरण केंद्र येथे येते. त्यानंतर ते पाणी फिल्टर करून शहरातील वामन नगर व घाटपुरी टाकीवरून शहरातील विविध भागात त्याचा पुरवठा करण्यात येतो.

गेरु माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणातून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी येण्यास जवळपास दोन ते अडीच तासांचा कालावधी लागतो. जर या दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाला तर पाणी येण्यास उशिर होतो. पर्यायाने पाण्याच्या दोन्ही टाक्या उशिरा भरतात.

त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत होते. पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक सतत बदलत असल्यामुळे नागरिकांना सगळे कामधंदे सोडून पाण्यासाठी दिवस-रात्र एक करावी लागत आहे. पाण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे नागरिक मुकाटपणे हा त्रास सहन करतात. शहरातील विविध भागात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जवळपास एक कोटी लिटर पाणी दररोज लागते.

शहरातील जुन्या भागातील पाइपलाइन ही जुनी आहे. सदरची पाइपलाइन ही जुनी असल्यामुळे ही पाइपलाइन कधी फुटते तर कधी वॉल लिकेज होतात. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी वाहून जाऊन त्याचा अपव्यय होतो. जर शहरातील कोणत्याही भागातील पाइपलाइन अथवा वॉल लिकेज झाला तर त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारे मनुष्यबळ आजमितीस नगर पालिकेजवळ नसल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...