आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजर्षी शाहू परिवाराचा उपक्रम:सैनिकांना जमिनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु; आ. महाले यांचे आश्वासन

बुलढाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैनिकांच्या अनेक समस्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शासनाकडून जमिनी मिळतात. मात्र, विदर्भातील सैनिकांना जमिनी दिल्या जात नाहीत. भविष्यात विदर्भातील सैनिकांना जमिनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन आमदार श्वेता महाले यांनी दिले.

राजर्षी शाहू परिवाराच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी चिखली येथील हॉटेल मीरा सेलिब्रेशनच्या सभागृहात आयोजित सैनिकांचा सन्मान सोहळा व महिला बचत गटांचा मेळावा कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन राजर्षी शाहू मल्टिस्टेट च्या अध्यक्षा मालती शेळके यांच्या हस्ते झाले. आजादी का अमृत महोत्सव, राजर्षी शाहू पतसंस्थेसोबत आर्थिक स्वातंत्र्याची २० वर्षे आणि संस्थेच्या ५०० कोटी ठेवींची उद्दिष्टपूर्ती यानिमित्त क्रांतिदिन ते स्वातंत्र्यदिन सप्ताहात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून चिखलीत सैनिकांचा सन्मान व महिला बचत गटांचा मेळावा पार पडला. पुढे बोलतांना आ. श्वेता महाले म्हणाल्या, राजर्षी शाहू परिवार सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतो. नैसर्गिक आपत्तीत ही या परिवाराने संकटग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी स्तुत्य कार्य केले आहे.

तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना क्षितिज फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल कदम यांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. संतुलित व योग्य आहार घेऊन आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. संदीप शेळके म्हणाले की, बचत गटांच्या महिलांनी घेतलेल्या कर्जाचे योग्य नियोजन करावे. उत्पादक आणि अनुत्पादक हा फरक लक्षात घेऊन उत्पादक गोष्टीत पैसे गुंतवावे. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.कार्यक्रमाला डॉ. स्मिता दळवी, आदर्श अर्बनचे अध्यक्ष विशाल भडाईत, मंगला सवडतकर, डॉ.अरुणा देशमुख, स्थानिक संचालक सुभाष मामा गायकवाड, गणेश देशमुख, विजय महाजन, संदीप बांबल, राधेश्याम सावळे, अर्जुन इंगळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

शहीद स्मारकासाठी निधी
राजर्षी शाहू परिवाराला सैनिकांबद्दल आदर, आत्मीयता आहे. त्यांच्यासाठी विविध योजना राबवण्याचे आश्वासन संदीप शेळके यांनी दिले. तसेच चिखली येथे साकारणाऱ्या शहीद स्मारकासाठी २१ हजारांचा कृतज्ञता निधी दिला. देऊळगाव राजा येथे कार्यक्रमातही त्यांनी सैनिकांसाठी कृतज्ञता निधी दिला होता.

मानवी साखळीतून साकारलेल्या देशाच्या नकाशात सैनिक, वीरमाता-पिता, पत्नींचा सहभाग हॉटेल मीरा सेलिब्रेशनच्या प्रांगणात मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा साकारण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित आजी, माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, बचत गटांच्या महिला, राजर्षी शाहू परिवाराचे सदस्य यांनी मानवी साखळीतून साकारलेल्या नकाशात सहभाग घेतला. राजर्षी शाहू परिवाराच्या या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...