आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:आठ दिवस पावसाचा खंड; जिल्ह्यात पिकांवर अळ्यांचा प्रादूर्भाव, शेतकरी पुन्हा संकटात

बुलडाणा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ दिवसाच्या पावसाच्या खंडानंतर सोयाबीन पिकात कमी-अधिक प्रमाणात हुमणी या किडीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. या किडीची अळी जमिनीत राहून पिकांच्या मुळांवर हल्ला करून उपजीविका करते. कापसावरही गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव आढळून येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस पडल्यास या अळीचा प्रादूर्भाव कमी होईल व पिकांनाही जीवदान मिळण्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे.

यावर्षी जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली. २९ जुलैनंतर जवळपास बहुतांश ठिकाणी पाऊस पडला नाही. दरम्यान, या काळात कापूस, सोयाबीन या नगदी पिकांची लागवड करण्यात आली होती. एक लाख ८३ हजार ५५८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे तर सोयाबीनची लागवड तीन लाख ९४ हजार ४२५ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. सर्वत्र चांगला पाऊस असल्याने पिकांची वाढही झाली आहे. मात्र मध्यंतरी पावसामुळे पाने पिवळे पडण्याची वेळ आली होती. तर आता अळ्यांचा उपद्रव झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. कृषी विभागही सतर्क झाला असून कृषी विज्ञान केंद्राने चिखली तालुक्यातील अमोना, मेरा बुद्रुक, मलगी येथे सोयाबीन पिकात पावसाच्या मोठ्या खंडानंतर कमी अधिक प्रमाणात हुमणी किडीचा प्रादूर्भाव आढळून आल्याने पाहणी केली. खरीप हंगामातील कापूस पिकावर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने रस शोषक किडी, गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळून येतो. त्याबाबतही कृषी विभाग जागृत झाला असून उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत.

ऑगस्ट महिन्यात दिसून येणारा प्रादूर्भाव : कापसावर सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे अशा रस शोषक किडीचा प्रादूर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादूर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येतो. तुडतुड्यांचा प्रादूर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून आणि फुलकिड्याचा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून प्रादुर्भाव आढळून येतो. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव डोमकळ्यांचा स्वरुपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो. असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

एकरी २० झाडांची निवड करून करता येईल व्यवस्थापन
गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवड्याला एकरी शेतीचे प्रतिनिधित्व करतील अशी २० झाडे‍ निवडून प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडे संख्या मोजावी. त्यात गुलाबी बोंड अळी ग्रस्त फुले, पात्या आणि बोंडे यांची टक्केवारी काढावी. प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्क्यांपेक्षा जास्त आढळल्यास रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. प्रोफेनॉफॉस ५० टक्के प्रवाही ३० टक्के मिली किंवा क्लोरेट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ३ मिली किंवा थयोडीकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ टक्के एससी ३० मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १२ मिली या पैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
-जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सं. गं. डाबरे

कीड नियंत्रणासाठी जैविक बुरशीचा वापर
मे महिन्यात वळवाचा पाऊस पडतो यावेळी आपवर जे पावसाच्या पाण्यातून पडते. ते खऱ्या अर्थाने तेव्हाचे कोष असते. बोर, बाभळी लिंबाच्या झाडावर हे राहतात अन् नंतर प्रजननातून प्रगत होतात. हे कीड वर्षभर टिकतात. त्यालाच हुमणी किड म्हणतो. या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेटारायझियम ॲनिसोपली या जैविक बुरशीचा वापर १९ किलो प्रती हेक्टर या प्रमाणात जमिनीतून द्यावे, मेटारायझियम ॲनिसोपली या जैविक बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव ग्रस्त भागात आळवणी करावी.
-पी. पी. देशपांडे, कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा

बातम्या आणखी आहेत...