आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील सहा महिन्यापूर्वी एका खासगी कंपनीने पालखी मार्ग मधील मुख्य रस्त्याचे खोदकाम करून त्यामधून आपल्या कंपनीसाठी जमिनीतून वायरिंग केली. या रस्ता दुरूस्तीची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने घेतल्यामुळे सदर कंपनीने त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला आठ लाख रूपये देऊ केले होते. मात्र अजूनपर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाने खोदकाम केलेल्या ठिकाणी रस्ता बनवला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. खोदकाम केलेल्या ठिकाणी अपघाताचे देखील प्रमाण वाढले आहे.
ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांना गावातून जाणारा मुख्य रस्ता खोदकामासाठी एका खाजगी कंपनीने रीतसर परवानगी मागितली होती. त्या मोबदल्यात कंपनीच्या माध्यमातून ग्रामपंचायतला रस्ता खोदकामाचा मोबदला म्हणून स्क्वेअर फुट प्रमाणे आठ लाख रुपयांचा निधी देण्यात आला.तसेच रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात संबधितांना सदर रस्ता पूर्णतः दुरुस्त करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दरम्यान यासाठी काही गाव पुढाऱ्यांनी सुरुवातीला कडाडून विरोध केला व काम बंद पाडले.
मात्र अचानक काम बंद पाडणाऱ्यांचा विरोध पूर्णतः शमला आणि कंपनी ने त्यांच्या कामाला सुरुवात केली. काही सुज्ञ नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला यासंदर्भात विचारणा केली असता या रस्त्याची दुरुस्ती संबंधित कंपनी करून देणार असल्याचे सांगितले. जर संबंधित कंपनीने ही दुरुस्ती केली नाही तर ग्रामपंचायत या रस्त्याची व्यवस्थितपणे दुरुस्ती करेल अशा प्रकारचा शब्द दिला खरा पण आज सहा महिने उलटूनही त्या रस्त्याचे झालेल्या खोदकामाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे पालखी मार्गाच्या रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
ग्रामपंचायतने कोणत्या आधारे परवानगी दिली ?
एमएसआरडीसी अंतर्गत येत असलेला हा पालखी मार्ग खोदण्यासाठी त्यांचीच परवानगी घेणे आवश्यक होती. संबधित कंपनीने तसे न करता ग्रामपंचायत प्रशासनाकडे परवानगी मागितली. जर एमएसआरडीसी विभागाने संबधित कंपनीला परवानगी दिली असले तर ती कोणत्या आधारावर दिली.परवानगी दिली असेल तर त्या संदर्भात दुरुस्तीसाठी त्यांच्याकडून कशाप्रकारचे लेखी आश्वासन घेतले हे समजू शकले नाही. शेतकऱ्याला या शेतातून दुसऱ्या शेतात पाइपलाइन नेताना रस्त्यात खोदकामाची परवानगी घ्यावी लागते. अशा कंपन्यांसाठी परवानगी लागत नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
आठ लाख रूपयांचे धनी कोण : पालखी मार्ग खोदकामासाठी सुरुवातीला विरोध करणारे काही राजकीय पक्षाचे पुढारी आता यासंदर्भात ग्रामपंचायतला जाब विचारताना दिसत नाही. संबंधित कंपनीने खोदकाम केलेला रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतला आठ लाख रुपये दिले तर त्याचा नेमका धनी कोण? याचा अद्याप काही खुलासा झाला नसला तरी लवकरच त्यांची देखील नावे समोर येणार असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एकाने सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.