आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेतील अंतर्गत वादामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोल्यात मोठी कारवाई केली आहे. गोपीकिशन बाजोरिया यांची संपर्कप्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे गटांच्या वादाची रोजच चर्चा होत असताना यात नव्या वादाची भर पडली आहे. शिवसेनेतील नियुक्त्यांवरून झालेल्या वादातून एकमेकांवर कमिशनचे गंभीर आरोप, तक्रारी, पदाधिकाऱ्याच्या घरी तोडफोड आणि हल्ल्याच्या प्रयत्नाचा प्रकार घडल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.
नक्की वाद काय?
अकोल्यात गोपीकिशन बाजोरिया विरुद्ध दोन जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, महानगराध्यक्ष, अश्विन नवलेंसह इतर पदाधिकारी असा हा वाद आहे. बुधवारी (1 मार्च) रात्री शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांच्या गोरक्षण मार्गावरील सहकारनगर भागातल्या घरी तोडफोड झाली. यामध्ये सरप यांना मारहाणही करण्यात आली असा त्यांचा आरोप आहे. या संदर्भात सरप यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. बाजोरिया यांच्या सांगण्यावरून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे अकोल्यात शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
योगेश बुंदेले हे बाजोरिया यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे बाजोरिया यांच्याविरोधातच तक्रार दाखल करण्यात आली आहे. सरप यांच्या तक्रारीनंतर शहरातील खदान पोलिसात बाजोरिया समर्थक असलेल्या उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेलेंसह पाच जणांवर गुन्हे दाखल झाले. आपल्या घरावरील हल्ल्यामागे माजी आमदार गोपीकिशन बाजोरियाच असल्याचा गंभीर आरोप जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांनी केला आहे.
औटघटकेची नियुक्ती
गोपीकिशन बाजोरिया हे यापूर्वी संपर्कप्रमुख होते. परंतु, नव्या नियुक्त्यांमध्ये बाजोरिया यांना बाजूला सारत खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे संपर्कनेता म्हणून जबाबदारी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया शिंदे गटात दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र त्यांच्या कार्यकाळात अकोला जिल्ह्यात शिंदे गटाला बळकटी मिळण्याऐवजी वादच अधिक झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.