आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:जऊळका सरपंचपदाची 13 मे रोजी निवडणूक; रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक

सिंदखेडराजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तालुक्यातील जऊळका येथील सरपंचांना नुकतेच अपात्र ठरवले होते. रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी येत्या १३ मे रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.

तालुक्यातील जऊळका येथील सरपंच द्वारकाबाई सांगळे यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नागपूर खंडपीठाकडून ग्रा. पं. अधिनियम १९५९ नुसार गेल्या महिन्यात अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर सरपंचपद रिक्त झाले होते. या रिक्त पदावर आपली वर्णी लागेल व आपण कारभार करु या इच्छेने काही ग्रामपंचायत सदस्य विविध मार्गाने कामाला लागले होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश येण्यापूर्वीच येत्या १३ मे रोजी सरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आल्याचे पत्र सर्व सदस्यांना प्राप्त झाले आहे.

नायब तहसीलदार, सरपंच निवडणूक ग्रामपंचायत, जऊळका डॉ. प्रविणकुमार वराडे यांची स्वाक्षरी असलेल्या पत्रात १३ मे रोजी दुपारी २.०० वा. होणाऱ्या सरपंच निवडणुकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यादिवशी सकाळी १० ते १२ वा. पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी वेळ असून दुपारी २.०० वा. सभेला सुरुवात होऊन त्यामध्ये २.१० वा. पर्यंत नामनिर्देशन पत्र छाननी व उमेदवार यादी जाहीर करणे. २.०० ते २.२० वा. पर्यंत उमेदवारी मागे घेणे व अंतिम यादी जाहीर करणे. आवश्यकता भासल्यास २.३० वा. मतदान घेणे व निकाल जाहीर करणे अशी कार्यक्रम पत्रिका सभेच्या नोटीस मध्ये देण्यात आली आहे. सरपंच पद हे सर्वसाधारण स्त्री वर्गासाठी आरक्षित असल्याचे पत्रात शेवटी म्हटले आहे. सरपंच अपात्र ठरल्या नंतर ग्रामपंचायत सदस्यांची संख्या एकूण सात अशी उरली असून, त्यामध्ये सर्वसाधारण स्त्री सदस्यांची संख्या तीन आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी स्पर्धा होणार आहे.

याचवेळी सरपंच द्वारकाबाई सांगळे यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असल्याचे समजते. यासंदर्भात डॉ. प्रवीणकुमार वराडे यांनी सदर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश येतील ते तंतोतंत पाळण्यात येतील, असे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...