आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुरस वाढणार:दीड वर्षाच्या कालावधीनंतर होणार तेरा बाजार समित्यांची निवडणूक; वाढवलेली प्रशासकांची मुदत बनली होती डोकेदुखी

बुलडाणा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या धान्याला बाजारभाव मिळण्यासाठी महत्वपूर्ण व्यवस्था असलेल्या सहकार क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील प्रशासक मंडळाचा कारभार एप्रिल २०२१ सालीच आटोपला होता. मात्र गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुन्हा प्रशासकीय मंडळाचा कारभार वाढवण्यात आला. त्यानंतर निवडणुका लागण्याचे संकेत होते. मात्र तत्कालीन सरकारने तारीख पे तारीख वाढवून देत जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांवर अशासकीय प्रशासक मंडळ कायम ठेवले होते. हे प्रशासकीय मंडळ काही ठिकाणी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यासाठी उपयोगात आणले गेले. मात्र शेतकऱ्यांसाठी ते डोकेदुखी ठरले होते. बाजारभाव पाडण्यापासून तर समिती बंद पाडण्यापर्यंतच्या घटना त्यानंतर वर्षभरात घडल्या. आता निवडणुका जाहीर झाल्याने प्रत्येक पक्षांना ताकद दाखवण्याची संधी मिळाली आहे.

जिल्ह्यात तेरा बाजार समित्यांची मुदत एप्रिल २०२१ मध्ये संपली होती. मात्र कोरोनाचा धाक दाखवत सहकार क्षेत्रातील कोणत्याही निवडणुका घेण्यात आल्या नाही. त्यामुळे बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये या प्रशासकीय मंडळाला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली होती. तेव्हा जळगाव जामोद, मलकापूर, नांदुरा, बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा, मोताळा, संग्रामपूर या आठ बाजार समित्यांवर अशासकीय प्रशासक बसवण्यात आले आहेत. खामगाव व देऊळगाव राजा येथे शासकीय प्रशासकच कारभार बघत होता. खामगाव येथे अशासकीय प्रशासक बसवला. त्यावर पुन्हा राजकारण झाले होते. शेगाव, मेहकर व लोणार येथे संचालक मंडळ कारभार बघत होते. या तेराही समित्यांच्या निवडणुका कोरोनाचा संसर्ग न वाढल्यास होणार होत्या. मात्र पुन्हा प्रशासक बसवून ग्रामसेवा सोसायट्यांच्या निवडणुका घेतल्या. नवीन ग्रामसेवा सोसायट्या निर्माण झाल्याने आता निवडणुकीची मजा रंगतदार होणार आहे.

निवडणुकीसाठी आहेत चार मतदार संघ
जिल्हयातील तेरा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली आहे. एकूण चार मतदार संघासाठी ही निवडणूक होणार आहे. एका बाजार समितीमध्ये १८ सभासद राहणार आहे. यामध्ये ग्रामसेवा सोसायटी हा मतदार संघ मोठा असून ११ सदस्य या मतदार संघातून निवडून द्यावे लागणार आहे. चार सदस्य ग्रामपंचायतींमधून दोन सदस्य अडत व्यापारी व एक सदस्य हमाल मापारीमधून निवडून द्यावे लागणार आहे.

२९ जानेवारी रोजी मतदान
नोव्हेंबर अखेर मतदार यादीवर आक्षेप नोंदवल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या सप्ताहात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. २३ ते २९ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करणे, ३० डिसेंबर रोजी अर्ज छाननी, वैध नामनिर्देशन पत्र प्रसिद्ध करण्याची तारीख २ जानेवारी, १६ जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.१७ जानेवारी निशाणी वाटप, २९ जानेवारी मतदान व ३० जानेवारी मतमोजणी होणार आहे.

ग्रामसेवा व ग्रामपंचायती आटोपल्या
वर्षभराच्या काळात जिल्ह्यातील जवळपास ५५० हुन अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. तर सध्या आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. त्यामुळे नवीनच सदस्यांच्या हाती ग्रामपंचायतींची डोर आल्यास निवडणुकीची बाजी पालटू शकते. ग्रामसेवा सहकारी संस्थांमध्येही नवीन सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघासाठीही नव्याने कस लागणार आहे. एकंदरीत ही निवडणूक दिग्गजांना एवढी सोपी जाणार नाही. मोठ्या बाजार समित्या ताब्यात घेण्यासाठी आता महाविकास एकत्र आली असून भाजप व शिंदे गटाचे काय असा प्रश्न आहे.

एकुण ग्राम सेवा सोसायटी : जिल्ह्यात एकूण ५६७ ग्रामसेवा सोसायट्या आहेत. यापैकी निवडणुकीसाठी पात्र ५५५ ग्रामसेवा सोसायट्या आहेत. जवळपास ४९४ ग्रामसेवा सोसायटीच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. ६१ सोसायटीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. हा सर्वात मोठा मतदार संघ बाजार समिती निवडणुकीसाठी आहे.

बातम्या आणखी आहेत...