आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबागलाण तालुक्यातील नऊ हजार सभासद संख्या आणि शंभर कोटींच्या ठेवी सह १४७ कोटींची उलाढाल असलेल्या सटाणा मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणूक पूर्वतयारीला वेग आला आहे. सत्ताधारी व विरोधी गटाकडून पॅनल निर्मिती आणि राजकीय आखाडे बांधण्यास सुरुवात झाली आहे.
या बँकेच्या दोन शाखा आहेत. सटाणा मुख्य शाखा तर नामपूर येथे उपशाखा असा विस्तार असलेली ही बँक मागील पंचवार्षिकमध्ये दोन वेळा प्रशासक बसूनही सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली आहे.
सध्या सहकारातील विविध संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सटाणा मर्चंट बँकेची ही निवडणूक होणार असल्याने विरोधी गटाचे प्रमुख डॉ व्ही. के. येवलकर आणि सहकाऱ्यांनी श्री सिद्धिविनायक पॅनलची निर्मिती करीत उमेदवारांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. सभासदांना सोशल मीडिया, पत्रकबाजीच्या माध्यमातून संपर्क करीत अप्रत्यक्षरित्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर सत्ताधारी गटाने समकोचे माजी चेअरमन श्रीधर कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पॅनलची निर्मिती केली आहे. तालुकाभर सभासद असले तरी शहरातील सभासद असलेल्या व्यापारी वर्गाचा बँकेवर असलेला प्रभाव हा कायम टिकून आहे. ग्रामीण भागातून बँकेवर संचालक म्हणून निवडून जाण्याची संधी आजपर्यंत क्वचितच मिळाली आहे. मात्र यावेळी दोघाही पॅनल कडून ग्रामीण भागातून संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. ग्रामीण सभासद आपल्या भागास प्रतिनिधीत्व मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
प्रामुख्याने मोसम आणि आरम खोऱ्यात सभासद संख्या जास्त असल्याने ग्रामीण भागातून संचालक होण्याची संधी कोणाला मिळते हे येणाऱ्या काळातच समजेल. यापूर्वी अनेक दिग्गजांनी समकोचे चेअरमन व संचालक पद भूषविलेले आहे. यामध्ये माजी आमदार संजय चव्हाण, साखरचंद राका, गोविंद शंकर गहिवड, अशोक लक्ष्मण येवला, रमेश संभाजी देवरे, शांतिलाल राका, सोमनाथ ब्राह्मणकार, रामकृष्ण येवला, सुभाष ततार यांच्यासारख्या दिग्गजांनी बँकेची धुरा सांभाळलेली आहे. गत पंचवार्षिकमध्ये कधी नव्हे एवढा बँकेचा वाद चव्हाट्यावर आल्याने समकोची मात्र सहकार दरबारी बऱ्यापैकी इभ्रत गेली असली तरी यातून तावून सुलाखून निघालेल्या सटाणा मर्चंट को-ऑप. बँकेची सत्ता सभासद नेमकी कोणाच्या हातात देणार हे आगामी काही दिवसात समजणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.