आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनागोंदी:विजेचा लपंडाव, बिल वसुली जाेरात ; नागरिकांना अंधारात राहण्याची आली वेळ

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणकडून विद्युत ग्राहकांना चोविस तास वीज उपलब्ध व्हावी, अशी नागरिकांना अपेक्षा असते. परंतु शहरात वेळीअवेळी वीज पुरवठा खंडीत हाेत असल्याने वीज ग्राहकांचा मागील आठ दिवसांपासून अपेक्षाभंग होत आहे. मात्र याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, तर दुसरीकडे वीज बिलाची मात्र सुलतानी वसुली सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे, तर काही दिवसात नवरात्राेत्सवही साजरा हाेणार आहे. या सण, उत्सवात विजेचा असा खेळखंडोबा सुरू राहिला, तर नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. एखाद्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर शहरात अनुचित घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने शहरात वीज पुरवठा खंडित होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहरवासीयांकडून हाेत आहे.

३० ऑगस्टला हरितालिका सणाच्या दिवशी शहरातील ऋषी संकुल वितरण केंद्राला पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही लाइनवर बिघाड झाल्यामुळे शहरातील भय्युजी महाराज आश्रम ते बाळापूर नाका, आशीर्वाद नगर, हिरानगर, शिवाजी फैल, सतीफैल, बर्डे प्लॉट, ओंकारेश्वर या भागांसह अर्ध्या शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे या भागातील महिलांवर सणाच्या दिवशीच अंधारात पूजाअर्चा करण्याची वेळ आली. त्यामुळे महिलांकडून महावितरण विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. रात्री उशिरा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. परंतु तोपर्यंत नागरिकांना अनेक तास अंधारातच राहून मच्छरांचा सामना करावा लागला होता.

मान्सूनपूर्व कामांचा उडाला फज्जा : महावितरणकडून दरवर्षी मान्सूनपूर्व मेंटेनन्सची कामे केली जातात. परंतु ही कामे केल्यानंतरही वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतच असतात. त्यामुळे महावितरण विभागाकडून मान्सूनपूर्व मेंटेनन्सची केली जाणारे कामे ही कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. मान्सूनपूर्व मेंटेनन्स कामांची वरिष्ठ अभियंत्यांकडून चौकशी होणे गरजेचे आहे.
वीज पुरवठा करण्यास महावितरणचे अपयश : शहराला चोविस तास वीजपुरवठा करण्यात महावितरणला अपयश येत असले तरी थकीत वीज बिल वसुलीकडे मात्र शंभर टक्के लक्ष असल्याचे दिसून येत आहे. कॉटन मार्केट परिसरात दररोज दिवसातून दोन ते तीन वेळा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...