आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमानी:भाजीपाला, फळ विक्रेत्यांकडून मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण; भाजी, फळ विक्रेत्यांसमोर नगरपालिका व पोलिस प्रशासनही हतबल

नांदुरा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदुरा-मोताळा- बुलडाणा रोडवरील रेल्वे स्टेशन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुढे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रस्त्याचे पुनर्बांधणीचे काम सुरु असतानाही फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करुन भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे शहराच्या या मुख्य मार्गावर वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतुक प्रभावीत झाली असून या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे भाजीपाला व फळ विक्रेत्यांवर पालीका व पोलीस प्रशासन कुठलीच कारवाई करीत नसल्याने ते हतबल झाले की, काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शहरातील मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर इतर रस्त्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. मागील काही दिवसापासुन या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सूरू आहे. असे असताना देखील या रस्त्याच्या दोन्ही बाजुला भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. या अतिक्रमणांमुळे भविष्यात वाद होण्याची शक्यता आहे. परिणामी शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे.

या फळ व भाजी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे. परंतु पालिकेचे मुख्याधिकारी व स्थानिक पोलीस प्रशासन या प्रकाराकडे पुर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. वास्तविक पाहता शहरात आठवडी बाजारा सोबतच गांधी चौकातील भाजी बाजार येथे व रेल्वेस्टेशन चौकातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये फळे व भाजी विक्रेत्यासाठी सर्व‌ सुविधायुक्त जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु अनेक दिवसापासुन भाजी विक्रेत्यांनी या मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे.

पालिका व पोलिस प्रशासन कोणत्या दबावाखाली या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा प्रश्न शहरातील जनतेला पडला आहे. नांदुरा ते मोताळा या रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. शहरातील रेल्वे स्टेशन चौक येथून या कामाला सुरुवात झाली आहे. रस्ता कामामुळे या रोडवर सतत मोठी जड वाहने, टिप्पर सोबतच प्रवासी वाहतूक सुरु असतें. रेल्वे स्टेशन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान भाजी व फळ विक्रेते ठरावीक जागे व्यतीरीक्त रस्त्यावर दुकाने लावुन व हातगाड्या लावुन बसत आहेत. त्यामुळे या रोडवर सतत वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या भागात बँका, शाळा, व दवाखाने असल्याने या रस्त्यावर वाहनासह नागरिकांची नेहमी गर्दी असते.

त्यामुळे रस्त्यावर फळ व भाजीची दुकाने लावणाऱ्यांमुळे वाहनांना व विद्यार्थी तसेच पादचाऱ्यांना गर्दीतून वाट काढत जावे लागत आहे. परिणामी या भागात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या व ठराविक जागेचा व्यतीरिक्त इतर ठिकाणी भाजी तसेच फळ विकण्यास बंदी घालून आणि रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी शहरवासी करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...