आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना धोका:देऊळगावराजातील अतिक्रमण काढूनही वाहतूक कोंडी कायम

देऊळगावराजाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपूर्वी नगर पालिकेच्या वतीने शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटवण्यात आले. अतिक्रमण हटवल्यानंतर मार्ग मोकळा श्वास घेईल, अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. मात्र अतिक्रमण काढूनही वाहतुकीची कोंडी कायम असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच शहराला वळण मार्ग असताना देखील जड वाहन गावातून जात असल्याने ते तत्काळ थांबवण्यात यावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येऊनही वाहतूक वारंवार विस्कळीत होत अाहे. राहेरी पुलावरील वाहतूक बंद झाल्याने शहरातून जड वाहनांची वर्दळ होऊ लागली आहे. गर्दी असलेल्या या मार्गावर जड वाहने प्रतिबंधित करा, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात येत आहे. पूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्ग वरून व्हायची, सहा वर्षांपूर्वी नागपूर पुणे राष्ट्रीय महामार्ग ७५३ ए हा वळण रस्ता सुरु झाल्यानंतर जड वाहनांना शहरातून बंदी घालण्यात आली. दरम्यान, पालिका मुख्य अधिकारी अरुण मोकळ यांनी पुढाकार घेऊन मागील महिन्यात शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटविले. यादरम्यान सिंदखेड राजा मार्गावरील राहेरी पूल बंद करून सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून जड वाहतूक बंद केली.

परिणामी पुणे-औरंगाबाद- जालना मार्गे मेहकर जाणारी वाहतूक देऊळगाव राजा- देऊळगाव मही मार्गे वळवण्यात आली आहे. ही वाहतूक बायपास मार्गाने वळवणे आवश्यक असताना यातील बहुतांश वाहतूक ही शहरातील मुख्य मार्गावरून होत आहे. पोलिस प्रशासनाने सदर वाहतूक वळण मार्गे वळवण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली नसल्याने भरधाव जड वाहने शहरातून जाणाऱ्या मार्गावरील गर्दीतून जात आहेत. परिणामी या मार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत असून शहरातील अतिक्रमण हटवण्यात येऊनही वाहतुकीची कोंडी शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. यातच सदर जड वाहनांच्या भरधाव वेगामुळे मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त होत आहे. सिंदखेडराजा मार्गाने येणारी वाहतूक शहरातून मार्गक्रमण करत असल्याचे पाहून चिखली ते जालना जाणारी काही जड वाहने शहरातून जात असल्याने या मार्गावर वारंवार ट्राफिक जामची समस्या उद्भवत आहे.