आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारच्या शेतमाल आयात धोरणाचा शेतकऱ्यांना कायम फटकाच बसत आहे. यापूर्वीही तूर आयातीची मुदत वाढवल्याने दरात मोठी घसरण झाली होती. तर आता हमीभावापेक्षा कमी दराने तुर बाजार पेठेत मिळत आहे. त्यातच आता सोयाबीनच्या दरातही झपाट्याने घसरण सुरु झाली आहे. मागील आठवड्यात सोयाबीन प्रति क्विंटल ७ हजार २०० रुपये होते. तर आता या सोयाबीनचे दर ६ हजार ५०० रुपये क्विंटलवर आले आहेत. सोयाबीनच्या दरात झपाट्याने घसरण सुरु झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु सध्याचे सोयाबीनचे भाव पाहता ही आशा धुसर होताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर काही शेतकऱ्यांना सोयाबीन साठवणूक केल्याचा देखील पश्चात्ताप होईल. असे सध्या सोयबीनचे दर आहेत. मागील पाच महिन्यात प्रथमच सोयाबीन हे सात हजाराच्या खाली आले आहेत. नोव्हेंबरपासून ७ हजार रुपये क्विंटल असेच दर राहिले होते परंतु मागील आठ दिवसांपासून चित्र बदलले आहे. केंद्र सरकारने सोयापेंडची आयात केल्याने सोयाबीनची मागणी घटली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण सुरु झाली आहे.
त्यातच आता उन्हाळी हंगामातील सोयाबीनची काढणी सुरु झाली आहे. त्यामुळे विक्रीसाठी नविन सोयाबीन बाजारात दाखल होणार आहे. त्यामुळे अजुन सोयाबीनच्या दरात घसरण येणार असल्याने ही बाब सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. त्यामुळे दरात लगेच सुधारणा न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे. वास्तविक पाहता यंदा शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल करून उन्हाळी हंगामात सोयाबीनवर भर दिला होता. शिवाय पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने उन्हाळी सोयाबीन मध्ये वाढ होणार आहे. उन्हाळी सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाल्यास दरात आणखीन घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यंतरी ७ हजार ६०० दर असताना ज्या शेतकऱ्यांनी विक्री केली त्यांचे चांगले साधले आहे. सोयाबीनच्या दरातच घसरण झाली असे नाही तर तूर आणि हरभऱ्याचेही दर घसरले आहेत. त्यामुळे विक्री की साठवणूक हा प्रश्न पुन्हा शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
तुरीचे दर ६ हजार तर खुल्या बाजारात हरभरा ४ हजार ३०० असा भाव आहे. त्यामुळे सोयाबीन विक्री शिवाय पर्याय नाही. तर दुसरीकडे मका आणि तुरीची खरेदी केंद्रावर विक्री हाच पर्याय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा राहणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. नगदी पिक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकाने शेतकऱ्यांना रडवण्याचे काम केले आहे. कांदा विक्रीतून उत्पादन खर्च निघणे तर दूरच उलटपक्षी खिशातील रक्कम कांदा पिकात चालली आहे. सध्या बाजारा ४०० रुपये प्रती क्विंटल दराने कांद्याची विक्री होत आहे. एकीकडे कृषी निवीष्ठाच्या वाढलेल्या किमती आणि शेतमालाच्या बाजार भावात घसरण यांचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसत आहे.
कांदा उत्पादक शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित
शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी गुजरातमध्ये कांद्याला २०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात येते. मात्र महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्याला मदत मिळत नाही.
सध्या असे आहेत शेतमालाचे भाव
सध्या बाजारात सोयाबीनला ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव असून तुरीला सहा हजार रुपये तर हरभऱ्याला ४ हजार ३०० रुपये तर कांद्याचे प्रति क्विंटल चारशे रुपये असे भाव आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.