आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेंडवळ घटमांडणीचे भविष्यकथन:राजा कायम राहणार, पण देश आर्थिक संकटात राहील; पाऊस-रोगराई आणि पिकांबाबत असे आहे भाकीत

जळगाव जामोद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीक परिस्थिती, पाऊस पाणी, त्याच बरोबर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज भेंडवळ येथील घटमांडणीच्या माध्यमातून वर्तवला जातो. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीच्या माध्यमातून केली जाणारी भविष्यवाणी ही विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे संपूर्ण राज्याचं खासकरून शेतकऱ्याचं लक्ष लागलेले असते.

चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी निरीक्षणे करून यंदाचा अंदाज जाहीर केला.
चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी निरीक्षणे करून यंदाचा अंदाज जाहीर केला.

शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट , घटात पाणी व त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी व विविध 18 प्रकारची कडधान्ये. अशा या ‘घटमांडणी’तून वर्षभराचा हंगाम ,पीक पाऊस अर्थव्यवस्था ,संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकित या घटमांडणीतून केले जाते. आज बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी दावा करतात की 350 वर्षांपुर्वीपासून अक्षयतृतीयेला ही प्रथा जोपासली जाते, या भविष्यवाणी कडे सर्वांचेच लक्ष लागून असते. या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी निरीक्षणे करून हा अंदाज जाहीर केला.

गेल्या वर्षी देशावर कोरोना सारख्या भयंकर रोगाने आक्रमण केलं होते. येणाऱ्या वर्षभरात नेमकी पावसाची पिकांची देशातील राजकीय स्थिती काय असणार आहे हे या अंदाजानुसार जाणून घेऊयात. हे अंदाज किती खरे ठरतात यावर शंका असली व या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला तरी मात्र शेतकरी यावर मोठा विस्वास ठेऊन आपल्या वर्षभराच शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसारच करतात. या वर्षभरासाठीचे भेंडवळ घट मंडणीतील आज जाहीर करण्यात आलेले अंदाज.

पीक पाण्याचा अंदाज -

कापूस , उडीद , ज्वारी , हरभरा ही पिके चांगली येतील व भाव ही चांगला मिळेल , तर वाटाणा , बाजरी , गहू, करडई ही पिके मध्यम स्वरूपात येतील, देशात पीक चांगले येईल. मात्र, पिकांना भाव मिळणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राजकीय भाकीत -

राजा कायम असणार म्हणजे देशात सत्ता पालट होणार नाही. देशाचं संरक्षण चांगलं राहील, परंतु देश आर्थिक अडचणीत असेल, असही सांगण्यात आले आहे.

पाऊसाचा सर्वसाधारण अंदाज -

पावसाळ्यात जून महिन्यात कमी पाऊस ,जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस असणार आहे, अवकाळी पाऊस वर्षभर राहणार आहे.

आरोग्य विषयक -

तर गेल्या वर्षीप्रमाणे देशात व राज्यात आलेली रोगराई यावर्षी नसणार आहे, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशातील सर्वच विषयावर होते भविष्यवाणी -
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे शेकडो वर्षांपूर्वी येथील वाघकुळातील चंद्रभान महाराज यांनी घटमांडणी व भविष्यवाणीस प्रारंभ केला होता. यामध्ये मुख्यत्वे कृषीविषयक पीके, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत संपूर्ण वर्षभराचे भाकीत वर्तविण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील शेतात घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविण्यात येत असते. भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत ऐकून शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाचे पेरणी, पाण्याचे नियोजन करतात. पिढ्यांपिढ्यापासून हे भाकीत खरे ठरत असल्याचा दावा शेतकरी करीत असल्याने या मांडणी व भाकितावर जनतेने विश्वास ठेवला आहे. दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भाकीत ऐकण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्व स्तरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

बातम्या आणखी आहेत...