आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील एकही पीक हातात पडले नसल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडले असताना शासनाकडून अद्याप अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. महसूल विभागाने सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा न केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, मात्र नुकसानीची तक्रार करूनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई दिलेली नाही. राज्य शासनाने नियमित कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन म्हणून जाहीर केले.
मात्र शेतकरी या अनुदानाच्या अजूनही या लाभापासून वंचित असल्याने शेलुबाजार परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी दि. ६ शेलुबाजार चौकात चक्काजाम आंदोलन केले. पीक विमा भरूनही आज लाखो शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे होऊनही अद्यापपर्यंत त्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. शासनाकडून काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत प्राप्त झाली तर काही शेतकरी आजही अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहेत. अतिवृष्टी, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पंधरा दिवसात शासनाने त्वरित जमा करावी.
अन्यथा पंधरा दिवसानंतर शेकडो शेतकऱ्यांसह चक्का जाम आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे अर्जुन भीमराव सुर्वे यांनी दिला. विमा कंपनीने वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांनी विम्याची ठरावीक रकमेचा भरणा केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात कमी रक्कम जमा केली. तसेच अनेक शेतकरी नुकसान भरपाईस पात्र असतानाही कंपनीने त्यांच्या खात्यात एक रूपयाही जमा केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज राज्य सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले. यावेळी शेलुबाजार परिसरातील पीकविमा भरलेल्या पाचशेंहून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या पावत्या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडे देण्यात आल्या.
प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे शेतकरी आपल्या हक्कापासून वंचित असल्याने आंदोलनकर्त्यांनी रोष व्यक्त केला. दरम्यान, मंगरुळपीरचे नायब तहसीलदार यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मधुकर डोके, सुनील राऊत, मारोती खुले, देविदास जाधव, रामराव वाघमारे, दिलीप राऊत, रामा लांभाडे, गोवर्धन पाटील, अशोक हांडे, चंद्रशेखर जयभाय, गोपाल राऊत, प्रताप जायभाय, श्याम बोथे, नंदू येवले, गौरव येवले, ओम येवले, सार्थक येवले, सौरव येवले, प्रज्वल येवले, प्रफुल येवले, माणिक सुर्वे, गजानन सुर्वे, गोपाल सुर्वे, बालू सुर्वे, हरी सुर्वे, तेजेश सुर्वे, अण्णा खांनझोडे, भूषण सुर्वे, पांडुरंग राऊत, बोला राऊत, दयाराम राऊत (सरपंच पिंपरी), सुभाष राऊत, गजानन सुर्वे आदींसह शिवसेना, युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या आठ दिवसांत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची रक्कम जमा न केल्यास उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात जाऊन आत्मदहन करू, असा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अर्जुन भीमराव सुर्वे यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.