आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:भेंडवळच्या मांडणीवरुन शेतकऱ्यांनी केले खरिपाचे नियोजन

खामगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृग नक्षत्राला तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने मृगाच्या धारा केव्हा बरसणार याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांनी शेतजमीन पेरणी योग्य तयार करुन ठेवली आहे. यंदा अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भेंडवळच्या घट मांडणीत पिक पाण्याबाबत वर्तवण्यात आलेल्या भविष्यवाणी वरुन शेतकऱ्यांनी यंदा कोणते पीक घ्यायचे याचे नियोजन केले आहे. यानुसार काही शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते विकत घेवून ठेवली आहेत. त्यांना धो-धो पाऊस केव्हा बरसतो याची प्रतीक्षा लागली असून सध्या बाजारात सर्व प्रकारची बियाणे उपलब्ध आहे. काही शेतकऱ्यांजवळ सिंचनाची सोय आहे.

अशा शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड सुरु केली आहे. गतवर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसाने उत्पादनात मोठया प्रमाणात घट आली होती. तर काही शेतकऱ्यांनी पेरणीपासून ते काढणी पर्यंत लावलेला खर्च निघाला नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना परिवाराचे रहाट गाडगे चालवताना एकप्रकारे तारेवरची कसरत करावी लागत आहे. यंदा हवामान खात्याने १०३ टक्के पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवला आहे. भेंडवळच्या घट मांडणीत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस बरसण्याचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. भेंडवळच्या घट मांडणीत वर्तवण्यात येणाऱ्या पीक, पावसावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विश्वास आहे. या भविष्यवाणीच्या भरवशावर यंदा कोणते पीक घ्यायचे त्याचे नियोजन केले आहे. तर काही शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी केली आहे.

गत वर्षी निसर्गाने मारले यंदा तरी निसर्ग साथ देईल या आशेवर शेतकरी आहे. बैलजोडीने अनेक शेतकरी आपल्या शेतीची मशागत करतात. मात्र ज्यांच्याकडे बैलजोडी नाही ते ट्रॅक्टरच्या साह्याने मशागत करुन घेतात. ट्रॅक्टरमुळे वेळेची बचत होते आणि नांगरणी खोलवर होते. परंपरागत बैलजोडीच्या साह्याने मशागत न करता आधुनिक व यांत्रिकी पध्दतीने मशागतीची कास धरत आहे. जमिनीची पोत सुधारण्यासाठी शेतकरी रासायनिक खतापेक्षा शेणखताला महत्व देत आहे. कर्जाच्या खाईत लोटला गेलेला शेतकरी हिंमत न हारता नव्या कामाला लागला आहे.

खते, बी- बियाणे खरेदीसाठी लगबग हातउसने पैसे घेवून शेतीची पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतकऱ्यांनी आटोपली आहे. आता मृग नक्षत्र लागण्यास तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. बँकेच्या कर्जाची वाट न पाहता शेतकरी आपल्या जवळील शेतमाल विकून व दुसऱ्या जवळून हात उसने पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

कपाशी लागवडीकरिता मजूर मिळेना
कपाशीची लागवड करणाऱ्या महिला मजुराला सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत २०० रुपये रोज आहे. दोनशे रुपये रोज देऊनही काही गावात लागवडीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागात मजुराचा तुटवडा जाणवू लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...