आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:रस्त्यासाठी फर्दापूरच्या ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

मोताळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील फर्दापूर येथील गावातील रस्त्यावर गावातील नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून त्या रस्त्यावरून ऑटो रिक्षा तसेच जड वाहने गावात जाण्यास रस्ता कमी पडत आहे. त्यामुळे गावातील रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्यात यावा, या मागणीसाठी फर्दापूर ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट पासुन येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. दरम्यान, तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे.

तालुक्यातील फर्दापूर गावातील मुख्य रस्त्यावर मागील काही दिवसांपासून गावातीलच नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे गावातील रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरून ट्रॅक्टर, बैलगाडी, अंबुलन्स, ऑटो तसेच इतर जड वाहनांना ये-जा करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. गावातील गर्भवती महिलांना दवाखान्यात घेऊन जाणे तसेच शेतकऱ्यांना शेतीविषयक साहित्य आणि शेतमाल आणण्यासाठी व रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे हा रस्ता मोकळा करून देण्यात यावा, यासाठी नागरिकांनी गट ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी तथा तहसीलदार यांना वेळोवेळी निवेदन देऊन तोंडी सुध्दा सांगितले आहे. परंतु संबंधितांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.

त्यामुळे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्यात यावा, या मागणीसाठी गणेश पांडुरंग व्यवहारे, सोपान व्यवहारे, अमोल व्यवहारे, प्रमोद भोकरे, उद्धव व्यवहारे, मोहन व्यवहारे, पद्माकर व्यवहारे यांच्यासह ३४ नागरिकांनी १५ ऑगस्ट पासून येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण थाटले होते. यावेळी तहसीलदार सारिका भगत, नायब तहसीलदार एस.एन. वाघ, गटविकास अधिकारी मोहोळ, आमदार यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर वाघ, माजी सभापती मिलिंद जैस्वाल यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी तहसीलदार यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याचे सांगीतले. परंतु जोपर्यंत तहसीलदार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली होती. त्यावर तहसीलदार यांनी १८ ऑगस्ट रोजी बैठक बोलावून अहवाल सादर करण्याचे पत्र संबंधितांना दिले. त्यानंतर तात्पुरते उपोषण मागे घेण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...