आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज झाला असला तरी पेरणी करिता लागणारे बियाणे तसेच रासायनिक खतांच्या किमतीत झालेल्या दरवाढीने शेतकरी चिंताग्रस्त झालेला दिसत आहे. किनगावराजा परिसरात शेतीची पेरणी पूर्व मशागत जवळपास अंतिम टप्प्यात असून, खरीप हंगाम उंबरठ्यावर येऊन ठेपला असल्याने शेतकऱ्यांकडून पेरणीकरीता लागणारे बियाणे तसेच रासायनिक खतांचे नियोजन करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बियाणे तसेच रासायनिक खतांची खरेदी करताना शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. यंदाच्या हंगामात परिसरातील शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाच्या पेरणीकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे.
पेरणीकरिता लागणारे बियाणे तसेच रासायनिक खतांच्या किंमती गगनाला भिडल्या असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक बजेट बिघडले आहे. मागील वर्षी काही भागात सोयाबीनचे नवीन बी पेरलेले उगले नाही तर काही भागात पावसाची झळ बसली. परिणामी बियाण्यांची उगवण क्षमता आवश्यकतेनुसार कमी झाली. त्यामुळे अशा परिस्थितीत सोयाबीनच्या घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
कृषी केंद्राचा परवाना निलंबित करू
सिंदखेडराजा तालुक्यातील कृषी केंद्रावर खत बियाणे जास्त भावाने विकत असल्यास अथवा त्यासाठी जास्त पैसे मागत असेल तर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तक्रारीची पडताळणी करून संबंधित कृषी केंद्राचा परवाना निलंबित करू.
वसंत राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.