आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीचे तांडव:पिंप्री गवळी येथे आगीचे भीषण तांडव; दोन घरांची झाली राखरांगोळी

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंप्री गवळी येथे आज १६ मार्चच्या दुपारी तीन घरांना भीषण आग लागली. या आगीत दोन घरे पूर्णत: जळून खाक झाली आहेत. तर एका घराचे काही प्रमाणावर नुकसान झाले असून दोन कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे आग ग्रस्त कुटुंबांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील पिंप्री गवळी येथील परमेश्वर काशीराम बंड, नरेंद्र रामदास आल्हाट व मनोहर नानाजी इंगळे यांचे एकमेका शेजारी घरे आहेत. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास घराच्या बाजूला असलेल्या पडीक शेतातील गवताला आग लागली. काही वेळातच ही आग शेता शेजारी असलेल्या घराकडे पसरली. लाकुडफाट्याची घरे असल्यामुळे व हवेचा जोर अधिक असल्याने या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. घराला आग लागल्याचे लक्षात येताच घरातील सदस्यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीने प्रयत्न केले. टँकर आणून नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु घरातून आगीचे लोळ उठत असल्याने त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर खामगाव येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.

मात्र तोपर्यंत या आगीत परमेश्वर काशीराम बंड आणि नरेंद्र रामदास आल्हाट यांची घरे जळून खाक झाली होती. या आगीत घरातील, दाळ दाणा, कपडे यासह जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले होते. या आगीमुळे दोघांचे संसार पूर्णपणे उघड्यावर आले आहेत. तर मनोहर नानाजी इंगळे यांच्या घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आगीमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबियांना तातडीने मदत करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...