आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजातीय तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीविरुद्ध तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जमिअत उलमा ए हिंदच्या वतीने एका निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
निवेदनानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत अव्वल कारकून बी. एस. मिरगे याने सोशल मीडियावर इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद यांचे चरित्र मलिन करणारी पोस्ट व्हायरल करून मुस्लिम बांधवांच्या भावनांना ठेस पोहोचवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपी मिरगेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी अगोदर फक्त २९५ अ नुसार गुन्हा दाखल केला होता.
मात्र मुस्लिम सामाजाची मागणी मान्य करत आरोपीविरूद्ध कलम १५३ ब, ५०५ ची वाढ केली. वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर प्रसारीत केल्याने आरोपीविरूद्ध आयटी ॲक्टची कलम लावणे क्रमप्राप्त होते. परंतु ते कलम लावले नाही. मिरगेविरूद्ध आयटी ॲक्टचे कलम ६६ अ, ६७ सुद्धा लावण्यात यावे. तसेच आरोपीला ही पोस्ट कोणी पाठवली याची चौकशी करून संबंधितालाही आरोपी करण्यात यावे. जेणे करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना चपराक बसेल.
अशी मागणी जमीअत उलमा ए हिंदच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे. जमीअतचे जिल्हाध्यक्ष हाफिज खलीलउल्लाह शेख यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. यावेळी मुफ्ती अनीसोद्दीन, हाजी सय्यद अहमद, मौलाना जाफर, मौलाना तहेसिन, हाफिज वकार, मौलाना अ.मजीद खान, सय्यद नसीम, अमान गोहर, मो.हाजी, शेख इम्रान, अलीम खान, शाहरुख खान उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.