आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:एक लाखाची खंडणी मागणाऱ्या महिलेसह पाच साथीदारांना अटक

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमाचा फास आवळून शहरातील एका महिलेने जामठी येथील माजी सरपंच गजानन पाटील यांना फोन करून भेटण्यास बोलावले. भेटीचे ठिकाणही ठरले. मात्र ऐन वेळी तिच्या पाच साथीदारांनी येऊन पाटील यांना मारहाण करत पैशांची मागणी केली. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एक लाख रुपये मागितले. तसेच त्यांच्या खिशातून जबरीने पाच हजार रुपये काढून पसार झाले.त्यानंतर घाबरलेल्या माजी सरपंचाने शहर पोलिस ठाण्यात आपबीती कथन केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून त्या महिलेसह तिच्या पाच साथीदारांना अटक केली. ही घटना ३ सप्टेंबरला शासकीय डी. एड. कॉलेज परिसरातील एका पत्र्याच्या टीनशेडमध्ये घडली.

जामठी येथील माजी सरपंच गजानन पाटील यांना एका महिलेने फोन करून डी. एड. कॉलेज परिसरात असणाऱ्या टीनशेडमध्ये भेटायला बोलावले. माजी सरपंच भेटण्यास गेले असता ती महिला टीनशेडमध्ये अर्धनग्न अवस्थेत बसलेली होती. काही वेळानंतर त्या ठिकाणी महिलेचे साथीदार कृष्णा भास्कर पवार वय २४, अजय सुनील विरशीद वय २२, रूपेश सोनवणे वय २२, संतोष सखाराम जाधव वय ३५ व एका १७ वर्षीय अल्पवयीन युवकाने येऊन पाटील यांना मारहाण करत एक लाखाची मागणी केली. अन्यथा तुमचे केलेले व्हिडिओ शूटिंग सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी जबरीने त्यांच्या खिशातून पाच हजार रुपये काढून पोबारा केला. याबाबत माजी सरपंचाने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पुढील तपास पीएसआय दिलीप पवार करत आहे.

बातम्या आणखी आहेत...