आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:वन परिक्षेत्रामधील पाच आरा मशीन केल्या सील; मोताळा वन विभागाची कारवाई, लाकूडसाठा जप्त

बुलडाणा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोताळा व जळगाव जामोद वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी परिसरातील ५ आरा मशीन सीलबंद करत जळगाव जामोद जवळील खेलबारी शिवारात अवैधरीत्या विनापरवाना आडजात व साग प्रजातींचा बेवारस लाकूड साठा जप्त केला आहे. तसेच ५ आरा मशीन सील केल्या आहेत. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. जप्त केलेला माल ज्यांच्या मालकीचा असेल त्यांनी परवाना व दस्ताएवेजासह २४ जूनपर्यंत मोताळा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात सादर करण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा मुरकुटे यांनी केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख शे. सईद यांनी अवैधरीत्या लाकूड कटाई बंद करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हा उपवन संरक्षक अक्षय गजभिये यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार नेहा मुरकुटे व जळगाव जामोद वन विभागाचे कर्मचाऱ्यांच्या पथकाने मलकापूर, नांदुरा येथून २ आणि जळगाव जामोद येथील ३ आरा मशीनवर छापा टाकला असता त्या पाचही मशीनवर जवळपास ५० घनमीटर विना परवाना अाडजात लाकूड साठा मिळून आला. त्यामुळे या पाचही आरा मशीन सील करण्यात आल्या आहेत. या कारवाईच्या दोन दिवसांपूर्वी जळगाव जामोदजवळील खेलबारी शिवारात विनापरवाना आडजात व साग लाकडाची साठवणूक केल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे नेहा मुरकुटे आणि जळगाव जामोद येथील वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने २० आणि २१ जून रोजी खेलबारी शिवारातील या ठिकाणी छापा टाकला असता, त्याठिकाणी आडजात व साग प्रजातीच्या लाकडासह जळतन असा जवळपास १०० घनमीटर लाकडांचा साठा जप्त करून आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जप्त करण्यात आलेला लाकूडसाठा ज्यांच्या मालकीचा असेल त्यांनी २४ जूनपर्यंत परवाना मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा करण्याचे आवाहन मुरकुटे यांनी केले आहे. अन्यथा हा माल सरकार जमा करण्यात येईल, अशी माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...