आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखीव वन क्षेत्र:निमखेड शिवारात वन कर्मचाऱ्यांना मेंढपाळांची मारहाण; 12 विरुद्ध गुन्हा

मोताळा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानगंगा अभयारण्याच्या राखीव वन क्षेत्रात मेंढ्या चराईसाठी मनाई करणाऱ्या वन्यजीवच्या वन कर्मचाऱ्यांना मेंढपाळांनी मारहाण केल्याची घटना २ सप्टेंबरला दुपारी निमखेड शिवारात घडली. या प्रकरणी तक्रारीवरून शनिवारी रात्री उशिरा १२ जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

वनपरिक्षेत्र वन्यजीव खामगावचे वनरक्षक सिद्धेश्वर कारभारी पाटील हे आपले सहकारी वनपाल गोरखनाथ मंजुळकर, वनरक्षक नितीन चव्हाण, वनरक्षक योगेश गावंडे, वनपाल गणेश मिसाळ व काही वनमजूर हे २ सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजेपासून जंगलात गस्त घालत होते. दरम्यान दुपारी ४ च्या सुमारास काही मेंढपाळ जंगलात प्रवेश करून मेंढ्या चराई करताना दिसून आले. या वेळी वन कर्मचाऱ्यांनी ज्ञानगंगा अभयारण्याचे राखीव व वन संरक्षित वन असून त्यांना मेंढ्या चराईसाठी मनाई केली. परंतु मेंढपाळांनी काही न ऐकता त्यातील एकाने वन कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत मारण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी वन कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून ठेवले असता, दहा ते पंधरा मेंढपाळ हातात लाठ्याकाठ्या घेऊन वन कर्मचाऱ्यांच्या दिशेने चालून आले. या वेळी त्यांनी पकडलेल्या व्यक्तीस सोडता की तुमचे हातपाय मोडायचे, अशी धमकी दिली. त्यावर वन कर्मचाऱ्यांनी व्यक्तीस सोडण्यास नकार दिला असता, चिला धुळा गोरे याने काठीने वन कर्मचाऱ्यांना पायावर मारण्यास सुरुवात केली. तर सागर गोरे, दीपक गोरे, बाळू मोरे, नाना नेमाने, गणेश माने, हिरामण मोरे, बळीराम माने, धनंजय मोरे, विशाल गोयकर, पांडू महारनर आणि नारायण गोरे हे लाठ्याकाठ्या घेऊन ठोका यांना असे म्हणत आले व वन कर्मचाऱ्यांनी पकडून ठेवलेल्या एका जणास बळजबरीने घेऊन गेले. प्रकरणी वन कर्मचाऱ्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार वनरक्षक सिद्धेश्वर कारभारी पाटील यांनी बोराखेडी पोलिसांत दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी रात्री उशिरा उपरोक्त १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...