आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा हवेत गोळीबार:वन कर्मचाऱ्यावर मेंढपाळांचा हल्ला; दोन वनमजूर गंभीर जखमी

मोताळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राखीव वन परिक्षेत्रात मेंढ्या चारण्यास मनाई करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर मेंढपाळांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन वन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास पश्चिम खैरखेड बीटमध्ये घडली. जखमी वनमजुरांना उपचारासाठी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

येथील राजूर राउंडमधील पश्चिम खैरखेड बीटमधील रोपवनात काही मेंढपाळ हे मेंढ्या चारत असल्याची माहिती वनमजूर भारत राठोड, नारायण शेळके, सुनील राठोड यांना मिळाली. ही माहिती त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा मुरकुटे यांना दिली. त्या नंतर वन मजुरांनी मेंढपाळांना रोपवनात मेंढ्या चराईसाठी मनाई केली. त्यावेळी जवळपास पंधरा ते वीस मेंढपाळांनी त्या वन मजुरावर जीवघेणा हल्ला चढवला. यावेळी मेंढपाळ हातात लाठ्याकाठ्या घेवून वन मजुरावर तुटून पडले. वन मजुरांना लाठ्या काठ्यांनी मारहाण सुरू असतानाच वन परिक्षेत्र अधिकारी नेहा मुरकुटे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मेंढपाळांच्या तावडीतून वन मजुरांना सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु मेंढपाळ वन मजुरांना सोडण्यास तयार नव्हते. एवढचे नव्हे तर त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नेहा मुरकुटे यांनी हवेत तीनवेळा गोळीबार केला. गोळीबार होत असल्याचे पाहुन मेंढपाळांनी पळ काढला. त्यामुळे वन मजुरांचे प्राण वाचले. या हल्ल्यात भारत राठोड व नारायण शेळके या वन मजुरांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी बुलडाणातील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...