आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक रुग्ण:जिल्ह्यात आढळले गोवरचे चार, तर रुबेलाचा नवा एक रुग्ण

बुलडाणा, मलकापूर पांग्रा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोवराच्या संसर्गासाठी 6195 घरांंची तपासणी

राज्यात गोवर व रुबेला आजाराचे रुग्ण आढळत असल्याने बुलडाणा जिल्ह्यातही घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. या दरम्यान ६१९५ घर सर्वेक्षणात ४० हजार २५ जणांची तपासणी करण्यात आली. यातील २१ घरातील ७९ व्यक्तींना अंगावर पुरळ येणे वगैरे लक्षणे असल्याची आढळून आली. मात्र ही पुरळ विविध प्रकारच्या लक्षणांची असल्याचे निष्पन्न झाले. तरी यातील सहा संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते, त्यापैकी ५ जण बाधित आढळले असून यात एक रुबेला तर चार गोवरचे रुग्ण आहेत. गुरुवारी मलकापूर पांग्रा येथेही रुबेलाचे तीन संशयित रुग्ण आढळून आले.

गोवर रुबेला लसीकरण ९ महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची करण्यात येत आहे. आजपासून मोहिमेचा पहिला टप्प्याला सुरुवात झाली असून २५ डिसेंबर पर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. एम आर १ व एम आर २ चा डोस दिला जात आहे. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला १५ जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. २५ जानेवारी पर्यंत ही दुसरी मोहीम राहणार आहे. आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक यांच्याकडे गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित बालकांची यादी तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात येत आहे.

वर्षभरात ४४ संशयित
जिल्ह्यात वर्षभरात गोवराचा उद्रेक झाला नाही. मात्र ४४ संशयित रुग्ण आढळून आले होते. मात्र तपासणीअंती चार रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यामध्ये जुलै, ऑगस्ट व नोव्हेंबर महिन्यात हे रुग्ण आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी सांगितले.

गोवर रूबेलाचे तीन संशयित रुग्ण आढळले
मलकापूर पांग्रा

गोवर रूबेला प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली असतानाच मलकापूर पांग्रा परिसरात तीन संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, या तिघांपैकी एकाचा रक्त नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

गोवर रूबेला प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण २४ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात ४९५ बालकांना लस देण्यात आली. तसेच दुसऱ्या टप्प्यात ४७८ बालकांना लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील ३९ बालके आणि दुसऱ्या टप्प्यातील ३८ बालकांना लस द्यावयाची राहिली आहे. या दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काजण्यांचेही रुग्ण आढळून येत आहेत. हनवतखेड येथील कांजण्यांचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाद्वारे एकूण १५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये गोवर रूबेलाचे ३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. संशयित रुग्णांना लक्षणानुसार औषधोपचार करण्यात येत असले तरी मलकापूर पांग्रा आणि डोरव्ही येथील बालकांमध्ये रुग्णसंख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, डोरव्ही येथे शुक्रवारी तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी दिली. मलकापूर पांग्रा येथील खासगी रुग्णालयांमध्येही या आजाराचे रुग्ण आढळून येत अाहेत. गोवर रूबेला हा संसर्गजन्य आजार असून, संशयित रुग्णांपासून इतर बालकांना दूर ठेवण्याची सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

संशयिताचा नमुना तपासणीसाठी पाठवला
गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सेविका व आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करत आहेत. डोरव्ही येथे शुक्रवारी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संशयित रुग्णाचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे.सदानंद बनसोड, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मलकापूर पांग्रा

गावांमध्ये संशयित रुग्णांचे सर्वेक्षण सुरू
परिसरात सर्वेक्षण सुरू असून कांजण्या हा आजार वेगळा आहे, तर गोवर रूबेला हा आजार वेगळा आहे. संशयित रुग्ण आढळून आल्यास तातडीने त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतात. महेंद्रकुमार साळवे, तालुका आरोग्य अधिकारी

बातम्या आणखी आहेत...