आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राप्तिकर अधिकारी असल्याचे सांगत पुणे येथील रामदास दत्तात्रय बल्लाळ यांची बनावट नोटा देऊन वीस लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात माटुंगा पोलिसांनी अनिल यादव हिवराळे (३८) यास अटक केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता चार झाली आहे.पोलिसांनी अटक केलेल्या या चारही आरोपींना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी बोलते केल्यानंतर हे आरोपी काय माहिती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याप्रकरणी बल्लाळ यांनी मुंबईतील माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपींनी आयकर अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याकडे कारवाई दरम्यान नोटा जप्त केल्या आहेत. त्या नोटा बदलून द्यायच्या आहेत. त्यासाठी वीस लाख रुपयांच्या मोबदल्यात ४० लाख रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले. त्यासाठी बल्लाळ यांच्या सोबत मुंबईतील ओबेरॉय, ट्रायडंट, प्रीतम हॉटेल या ठिकाणी भेटी घेतल्या, तसेच बल्लाळ यांना अलिशान कारमध्ये फिरवले आणि त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याजवळून २० लाख रुपयांची रोकड घेऊन त्या मोबदल्यात त्यांनी भारतीय बच्चों का बँक असे लिहिलेल्या बनावट नोटा दिल्या आणि त्यांची फसवणूक केली.
या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राहुल गौड, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत कांबळे, सहाय्यक फौजदार जयेंद्र धुर्वे यांनी केला. तपासाअंती खामगाव तालुक्यातील चितोडा येथील सरपंच पती देवराव भाऊराव हिवराळे (३५), रविकांत जनार्दन हिवराळे (३६), योगेश वासुदेव हिवराळे यास मुंबईतून अटक केली तर त्यांचा सहकारी सध्या ठाणे येथील रहिवासी असा पत्ता दिलेला अनिल हिवराळे हा फरार झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी देवराव हिवराळे याच्या विरुद्ध नाशिक व साताऱ्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.