आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रशासनाचा गलथान कारभार:निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह म्हणून मेहकरच्या महिलेवर अंत्यसंस्कार; औरंगाबादच्या घाटीतील प्रकार

मेहकर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंत्यविधीनंतर कळले मृत महिला होती निगेटिव्ह

शहरातील कमल दारव्हेकर या महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे तिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. परंतु तपासणीपूर्वीच तीला डॉक्टरांनी कोरोना पॉझिटिव्ह दाखवून दिले. एवढेच नव्हे तर तिचा कोरोना पॉझिटिव्ह म्हणून अंत्यसंस्कार देखील करण्यात आला. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ती महिला निगेटिव्ह असल्याचे समजले. यावरून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. मागील काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील रेणुका माता मंदिर परिसरातील रहिवासी कमलबाई हरिभाऊ दारव्हेकर, वय ६१ या महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे तिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालय येथे हलवण्यात आले. या महिलेला श्वास घेण्यासाठी त्रास होता. महिलेला मुळात बीपीचा त्रास होता. तिच्या छातीत दुखत असल्यामुळे तिला येथील खासगी डॉक्टरांनी औरंगाबाद जाण्याचे सांगितले. औरंगाबाद येथे काही खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन आले असता जागा नसल्याचे सांगण्यात आले. मृतक महिलेचा मुलगा प्रवीण दारव्हेकर हा आपल्या आईला घेऊन दवाखान्याचे उंबरठे झिजवत होता. प्रत्येक रुग्णालयातून निराशा हाती आल्यानंतर प्रवीण दारव्हेकरने आपल्या आईला २३ एप्रिल रोजी घाटी रुग्णालयात नेले. रुग्णालय प्रशासनाने दोन घंट्याच्या वेटिंगनंतर ऑक्सिजन बेड दिले व उपचार सुरू केले. परंतु रुग्णाला अॅडमिट करत असताना अनेक प्रकारचे फॉर्म भरून घेण्यात आले.

त्यामध्ये कमलबाई दारव्हेकर यांची कोणत्याही प्रकारची तपासणी न करता तिचे केसपेपर तयार करत असताना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे लिहिण्यात आले. यावर प्रवीण दारव्हेकर यांनी संबंधित डॉक्टरांना विचारणा केली की, माझी आई आत्ताच हॉस्पिटलमध्ये आली व तुम्ही फॉर्म भरत असताना पॉझिटिव्ह का लिहिले. त्यावर डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही रुग्ण पाहून सांगतो हा रुग्ण निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. काही वेळानंतर कमलबाई दारव्हेकर यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. ती टेस्ट निगेटिव्ह की पॉझिटिव्ह हे माहीत नसताना डॉक्टरांनी कोरोना पॉझिटिव्ह समजून उपचार केले. महिलेला त्रास छातीत दुखण्याचा होता. हाय बीपीचा त्रास होता. कमलबाई यांचा घाटी रुग्णालय प्रशासन भलताच उपचार करत होते. दरम्यान, २४ एप्रिल रोजी सकाळी साडे आठ वाजता कमलबाई दारव्हेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरांनी मृतक कमलबाई दारव्हेकर यांचा मृतदेह कोरोना नियमानुसार पॅकिंग करून दिला.

प्रवीण दारव्हेकर यांना आपल्या आईला मूळ गावी आणता आले नाही. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तिचा अंत्यविधी औरंगाबाद येथेच करण्याचे डॉक्टरांनी सांगितले. कमलबाई दारव्हेकर यांचा अंत्यविधी औरंगाबाद येथे करण्यात आला. अंत्यविधी करून प्रवीण दारव्हेकर आपल्या मूळ गावी मेहकर येथे आल्यानंतर २५ एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता त्याला एक मॅसेज आला व त्यांची आई निगेटिव्ह असल्याचे समजले. यावरून घाटी रुग्णालय प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे नातेवाईकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...