आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीमुळे उभे पीक खराब:‘शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार आर्थिक मदत द्या’ ; तहसीलदारांकडे मागणी

संग्रामपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे बांध फुटून उभे पीक खरडून गेले. तसेच बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतीला तलावाचे रूप आल्याने उगवलेले पीक जळाले असून शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. त्यात या संकटातून निघत नाही तोच पिकांवर किडीचा प्रादुर्भाव व हरिणाची कळपे उभे पीक फस्त करत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पीक नुकसानीचा सर्व्हे करून तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्या, अशी मागणी संग्रामपूर शहर येथील शेतकरी, नागरिकांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केले की पहिल्या मृग नक्षत्रात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पावसाअभावी पेरण्या उलटल्यामुळे दुबार पेरण्या कराव्या लागल्या, तर बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने पेरलेले उगवलेच नाही. उसनवार करून पेरण्या केल्याने कर्जबाजारी झालेला शेतकरी पूर्णत: खचला असून, आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तहसीलदारांमार्फत दिलेल्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी शेतकरी आनंद राजनकर, राहुल संजय शिरसोले, प्रा. रमेश राजनकर, पांडुरंग इंगळे, डॉ. अनिल वानखडे, भारत बावस्कार, दुर्गासिंग सोळंके, गणेश वानखडे, शेख अफरोज, तुषार सातव, शेख अफसर कुरेशी, प्रशांत गोसावी, रवी पहुरकर, वसंत मगर, शरद राजनकर, अभिनीत शिरसोले, आदित्य सोनोने, विनोद राजनकर, पवन राजनकर, गजानन देशमुख, विशाल वानखडे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...