आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ज्ञानगंगा अभयारण्यात गो.से. विद्यालयातील सेवकांचे श्रमदान; बाबासाहेब बोबडे यांच्या जयंतीनिमित्त जंगलात वन्य प्राण्यांसाठी केली पाणवठ्यांची निर्मिती

खामगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या उन्हामुळे जंगल क्षेत्रातील नैसर्गिक पाणवठे आटत चालले आहेत. त्यामुळे तहानेने व्याकूळ झालेले वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत शिरत आहेत. त्यातून वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष निर्माण होत आहेे. हा संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेत. त्या अनुषंगाने येथील गो. से महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेब बोबडे यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानगंगा अभयारण्यात श्रमदान करून वन्य प्राण्यासाठी कृत्रीम पाणवठ्यांची निर्मिती केली.

बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राखीव, संरक्षित आणि पूर्वापार जतन केलेले वन क्षेत्र आहे. या वनक्षेत्रात बिबट्या, अस्वल, नीलगाय, रानगवे, मोर, रानडुकरे, साळिंदर आदी वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. ४४ अंश सेल्शिअंश तापमानात सारोळा मांडणी या गावच्या मध्यभागी ज्ञानगंगा अभयारण्यात रखरखत्या उन्हात तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन सारोळा येथे करण्यात आले होते. शिबिरामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या ९० विद्यार्थ्यांच्या सहभाग होता. वन्यजीव खामगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ, सुभेदार मेजर धर्मेंद्र सिंह, कुंठी ग्रामपंचायतचे सरपंच संजय ठोंबरे, उपसरपंच छाया जाधव, सारोळा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेषराव साळवे, साहेबराव हेलोडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पाणवठा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रा. डॉ. धनंजय तळवणकर व वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानगंगा अभयारण्यातील मांडणी जवळ असलेल्या एका जिवंत नाल्याची पाणवठा प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. सारोळा येथील प्राथमिक शाळेत निवासी राहून हा पाणवठा स्वयंसेवकांच्या मदतीने तीन दिवस श्रमदान करून पूर्ण करण्यात आला. या पाणवठ्याला दगडाची पिचिंग करण्यात आली आहे. त्यामुळे पावसातही त्याला कुठल्याही धोका निर्माण होणार नाही, अशी माहिती प्रकल्प समन्वयक डॉ. हनुमंत भोसले यांनी दिली. प्रकल्पाला उपाध्यक्ष अशोक झुणझुणवाला, संचालक अजिंक्य बोबडे, सचिव प्रशांत बोबडे यांनी भेटी दिल्या. विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व गावातील नागरिकांनी प्रकल्पावर येऊन श्रमदान केले. या प्रकल्पासाठी प्रा. नानासाहेब कुटेमाटे, डॉ. नीता बोचे, एनसीसी ए.एन.ओ प्रा.सुहास पिढेकर, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन शिंगणे, गजानन सुरवाडे, निवृत्ती चोपडे यांनी सहकार्य केले.

प्रकल्पामुळे वन्यप्राण्यांना अधिवासाजवळच पाणी
मानवी अतिक्रमणांमुळे वन्यप्राणी नामशेष होतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कारण माणसाने वन्य प्राण्यांचा जास्तीत जास्त वावर असलेले पाणवठे तसेच नैसर्गिक जलस्रोतांवर अतिक्रमण केले आहे. वन्यप्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी रखरखत्या उन्हात या पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासाजवळच पाणी उपलब्ध झाले आहे.
किशोर पडोळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव खामगाव

बातम्या आणखी आहेत...