आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा:पालकमंत्री मिळाले, नियोजनाच्या बैठकीकडे आता जिल्ह्याचे लक्ष; तब्बल ३२६ कोटी रुपयांचा निधी नियोजन विभागात पडून

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले असले तरी आता उत्कंठा जिल्हा नियोजनची बैठक केव्हा होते याची लागली. जिल्ह्याच्या नियोजनाला ३२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पालकमंत्री नसल्याने हा निधी तसाच अडकून पडला होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणारी विकास कामे रखडली होती. आता पालकमंत्री केव्हा एकदा बैठक घेतात व कोणत्या कामाला प्राधान्य देतात. यावर पुढील विकासाची कामे अवलंबून आहेत.

जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा नियोजन सभेत तत्कालीन पालकमंत्री यांनी सहा महिन्यापूर्वी मंजूर केला होता. या नियोजित कामाचा आढावाही घेतला होता. जवळपास २७६ कोटीच्या आराखड्यात ५० कोटींची भर तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी घातली होती. त्यामुळे या निधीतून अपेक्षित असे विविध विकास कामे होणार होती.

१ एप्रिलपासून आहेत कामे बंद
जिल्ह्याच्या नियोजनात मंजूर करण्यात आलेली कामे १ एप्रिलपासून बंद आहेत. त्याआधीची कामे आटोपून नवीन नियोजनाच्या कामाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचे लक्ष होते. आता काही कामे पालकमंत्री यांनी घेतलेल्या आढाव्यानंतर त्यांच्या सहमतीने सुरू करण्यात आलीत. ही कामे जरी सुरू करण्याचे काम एजन्सीला दिले असले तरी निधी मात्र जिल्हा परिषदेला वितरीत केलेला नाही. पालकमंत्री कोणत्या कामावर किती निधी मंजूर करतात यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. पूल, संरक्षण भिंत, आरोग्य, शिक्षण, कृषी यासह इतर विभागाची महत्वाची कामे आता होणार आहेत.

प्रशासकांच्या हातात सत्ता
जिल्ह्यातील नऊ नगर पालिकांची सत्ता सध्या प्रशासकांच्या हातात आहे. त्या त्या नगर पालिकांचे मुख्याधिकारी सध्या प्रशासक म्हणून पालिकांचा कारभाराचा गाडा हाकत आहेत. असे असले तरी स्थानिक आमदारांचा या पालिकांवर वचक असल्याने मुख्याधिकारी नाममात्र प्रशासक असल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासक सीईओ आहेत. जिल्हा परिषदेत सध्याही पदाधिकाऱ्यांची चलती आहे. बहुतांश कामे त्यांनी मंजूर करून घेतलेली आहेत. मात्र मध्येच सत्तांतर झाले. त्यानंतर पालकमंत्रीच नसल्याने ही कामे अडकली होती.

लवकरच नियोजनाची बैठक होईल
जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नसली तरी पालकमंत्री यांनी आढावा घेऊन काही कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कामे सुरू करण्यात आलीत. काही एजन्सींकडून प्रस्तावही मागवला आहे. ही कामे जिल्हा परिषद, नगर पालिका व राज्य सरकारच्या अखत्यारीतील आहेत. जिल्हा नियोजनची सभाही पुढच्या आठवड्यात होणार आहे. मात्र पालकमंत्री कोणती तारीख देतात, यावर ही बैठक अवलंबून आहे.
सुनय लाड, जिल्हा नियोजन अधिकारी, बुलडाणा.

बातम्या आणखी आहेत...