आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंगणेंनी 1 ऑगस्ट रोजी बोलावली बैठक:रोही वन्य प्राण्यांचा हैदोस; त्रस्त शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात वनपरिक्षेत्र असलेल्या सर्व गावात रोही या वन्य प्राण्यांच्या कळपाने हैदोस घातला असून रोहींचे कळप शेती पिकांची अतोनात नासाडी करत आहेत. तसेच वन विभाग परिसरातील रोहींच्या वाढत्या संख्येने हतबल झाल्याचे दिसत आहे. रोहींच्या कळपांना शेतकऱ्यांच्या शेती पिकात जाण्यापासून प्रतिबंध लावण्यासाठी कुठलेच उपाय करताना दिसत नाही. त्यामुळे माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी येत्या १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक बोलावली आहे.

देऊळगावराजा, सिंदखेडराजा, चिखली व लोणार तालुक्यातील अनेक शेतकरी रोही वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळले आहे. दरम्यान, याबाबत त्रस्त शेतकऱ्यांनी संबधित विभाग व तहसीलदार यांना वेळोवेळी निवेदन देखील दिले आहे. तर त्यांच्या समस्यांच्या विविध वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित होऊन सुध्दा वन विभाग याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. उपरोक्त तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी, तूर यासह आदी पिकांची रोही प्राणी नासाडी करत असल्याने शेतकरी त्रस्त झाले अाहे. हातातोंडाशी आलेला घास निघून जात असल्याचे शेतकरी उघड्या डोळ्याने पाहत पुरते हतबल झाले आहेत.

वन विभागाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करत असताना त्यावर काहीच हालचाली होत नाही.त्यामुळे वाकी बुद्रुक येथील शेतकरी उद्धव नागरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला व आपली कैफियत ऐकवली. मुख्यमंत्र्यांनीही ती शांततेने ऐकून घेत, आपल्या स्वीय सहाय्यकांना तक्रार नोंदवून घेण्यास सांगितले. त्यानंतर महसूल व वन विभागाच्या सचिवांना फोन लावून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. मूळ शिवसेनेशी संबंध असलेल्या सदर शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्या मोबाइलद्वारे फोन केल्याबाबतची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक
रोहींचे कळप शेती पिकाची नासाडी करत असल्याचे सिंदखेडराजा मतदारसंघातून अनेक शेतकऱ्यांचे फोन आले आहे. याबाबत येत्या १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा वन अधिकारी व संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांची बैठक लावलेली आहे. शेतकऱ्यांना मदतीसह रोही प्राण्यांच्या प्रतिबंध संदर्भात तात्काळ उपाययोजना करा, असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
-आ. डॉ राजेंद्र शिंगणे.

शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उपाय करू
रोही वन्य प्राण्यांपासून शेत नुकसानी संदर्भात अद्याप जिल्हा वन विभागाकडे तक्रार अथवा माहिती मिळाली नाही. तरीही या संदर्भात संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क करून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याकरिता प्रतिबंधित उपाय योजना करू. तसेच शेतीचे नुकसान टाळता येण्यासारखे सर्व उपाययोजना राबवण्यासाठी वन अधिकाऱ्यांना आदेश देऊ. यासह नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवू.
-अक्षय गजभिये, जिल्हा उपवनसंरक्षक, बुलडाणा

बातम्या आणखी आहेत...