आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासैलानी येथील यात्रेत आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून आरोग्य विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या पाण्याची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात चार कोरोना रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना तपासणी केंद्र ही उभारले आहेत. ६ मार्च पासून यात्रेला नारळी होळी पेटवून सुरुवात होणार आहे. त्यामुळे दक्षता म्हणून प्रशासनाने आरोग्य रक्षणाचे पाऊल उचलले आहे. या यात्रेत तमाशाला मात्र स्थान राहणार नसल्याचे यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले होते. मागील तीन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रेला खंड पडला होता. पिंपळगाव सराई येथील भाविकांचे श्रद्धास्थान हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांचा दर्गा आहे.
या ठिकाणी सैलानी बाबाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे येतात. होळीपासून मुख्य यात्रा महोत्सवास प्रारंभ होवून संदल चढल्यानंतर फातेह खानी झाल्यानंतर यात्रा ओसरायला सुरुवात होत असते. या होळीमध्ये नारळासह मनोरुग्ण व नातेवाइकांनी अंगाखांद्यावरून ओवाळलेले नारळ, कपडे, गोटे यासह विविध वस्तू याठिकाणी टाकतात. मात्र या होळीत काय टाकावे याबाबतही जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत.्र रविवार, दि.१२ मार्च रोजी संदल निघणार असून रात्री दर्ग्यावर चादर चढवली जाणार आहे. दरम्यान, यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीची उपाय योजना म्हणून रस्ते मोठे ठेवण्यात आले आहे. तसेच अॅम्बुलन्स व अग्निशामक दलाच्या तीन गाड्या तैनात करण्यात आल्या आहे.
बसस्थानकांची निर्मिती
यात्रेसाठी बुलडाणा, जालना,औरंगाबाद, नांदेड,अकोला यासह इतर जिल्ह्यातील एसटी आगाराच्या वतीने स्पेशल बसेस सोडण्यात येत आहे. भाविकांना उतरण्यासाठी सैलानी यात्रा परिसरात विविध विभागाच्या वतीने स्वतंत्र बसस्थानकांची निर्मिती केल्यामुळे भाविकांची गैरसोय टळणार आहे.
यात्रेवर राहणार ड्रोनची नजर
आज होळीपासून यात्रेला सुरुवात होणार आहे. पाचव्या दिवशी संदल निघणार आहे. या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक सैलानीत दाखल होणार आहे. यात्रेदरम्यान कोणताही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी ड्रोन कॅमेरे यात्रेवर नजर ठेवणार आहे.
अवैध व्यवसायावर नजर
यात्रेत भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचा फायदा घेत. यात्रेत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय जसे की, चक्री, ऑनलाईन लॉटरी, रिंग गेम याप्रकारचे व्यवसायाच्या माध्यमातून सामान्य जनतेची लुट होत असते. तर पाकीटमारी, पैसे लुटण्याचे प्रकार सर्रास होत असल्याने पोलिसांना करडी नजर ठेवावी लागणार आहे.
सुरक्षेसाठी ८० ठिकाणी बंदोबस्त पॉइंट
जिल्हा पोलिस प्रशासनाने यात्रेदरम्यान ८० ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. याद्वारे अनुचित प्रकारावर नजर ठेवली जाणार आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास आपल्या जवळच्या बंदोबस्त ठिकाणी संपर्क करावा. - राजवंत आठवले, ठाणेदार रायपूर पोलिस स्टेशन.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.