आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण:डासांमार्फत होणारे आजार दूर करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज; नागरिकांना स्वछतेचे आवाहन

बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभागामार्फत जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या महिन्यातंर्गत विविध हिवताप नियंत्रण व जनजागृतीच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार घरोघरी डेंगू, मलेरिया विषयी कंटेनर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून माहिती पत्रकाच्या माध्यमातून डास अळी सर्वेक्षण, गप्पी मासे सोडणे आदींविषयी जनजागृती करीत आहे. पावसाळा सुरू झाला असून डासांची पैदास होवून आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे डासांमार्फत होणारे आजार दूर करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

विशेष डासामार्फत प्रसारीत होणारे हत्तीरोग, डेंगू, चिकनगुणीया, मलेरिया या रोगांच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभाग कार्य करीत आहे. डेंग्यू आजारावर निश्चित औषधोपचार नसल्यामुळे तसेच हा रोग जीवघेणा असल्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे हा एकच योग्य मार्ग आहे. त्यामुळे या रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. या उपक्रमांतर्गत आशांना रक्त नमुना घेणे, कंटेनर सर्वेक्षण करणे, डास उत्पत्ती स्थाने शोधणे, गप्पी मासे सोडणे, संडासच्या गॅस पाइपला जाळ्या बसवणे या विषयी प्रशिक्षित करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यामार्फत हस्त पत्रिकांचे वाटपही करण्यात येत आहे. हा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य सहाय्यक पाखरे, जाधव, आरोग्य सेवक जी.एन साळोक, काकडे, वनारे, पडोळकर, एल.एस साळोक यांनी सहभाग घेतला आहे.

एक दिवस कोरडा पाळावा
नागरीकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, झोपताना मच्छरदाणीचा वापर करून अंगभर कपडे घालावे, दाराला व खिडक्यांना जाळ्या बसवाव्या, डास चावणार नाही अशा साधनांचा वापर करावा, डास उत्पत्ती साधने नष्ट करून एक दिवस कोरडा पाळावा. ताप असल्यास रूग्णालयाशी संपर्क करावा, भंगार साहित्य, कुलर्स, टायर्स, नारळाच्या कवट्या, प्लॅस्टीकची तुटलेली भांडी, गाडगे, मडके सर्व नष्ट करावे.